जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अलीकडच्या काळात नाविन्यता, संशोधन आणि आंतरविद्याशाखेला आलेले महत्व लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाच्या पलिकडे जाऊन अध्ययन करण्याची गरज आहे. केवळ पदवी प्राप्त करण्यापुरते अध्ययन करु नका असे आवाहन माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्यावतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन करतांना ते बोलत होते. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी होते. अल्जेब्रा, ॲनॅलिसीस ॲण्ड फर्जी मॅथेमॅटीक्स या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. डॉ.के.बी.पाटील म्हणाले की, अभियांत्रिकी, वैद्यकीय, सामाजिकशास्त्र, वित्त, संगणकशास्त्र, आदी सर्व विषयांमध्ये गणिताचे महत्व आहे. संगणकाची मुलभूत रचनाच मुळी गणितावर अवलंबून आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाच्या पलीकडे बघण्याची गरज आहे. शासनावर पद आणि निधी उपलब्ध करुन देण्यावर मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत संशोधन आणि कन्सल्टन्सी यातून निधी उभा करावा लागेल. परदेशात याच पध्दतीने पैसा उपलब्ध केला जातो. त्यामुळे संशोधनावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.माहेश्वरी म्हणाले की, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संशोधनाचा समाजाला दीर्घकालीन फायदा होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय काय आहे हे अगोदर ठरवून घ्यावे. संशोधनासाठी आवड, संयम, निर्धार हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत. ज्ञानातूनही पैसा प्राप्त करता येतो असे ते म्हणाले.
प्रारंभी प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मंचावर प्रा.विनायक जोशी, पुणे उपस्थित होते. मानसी पाटील व ललित गिरासे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा.के.एफ.पवार यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात प्रा.विनायक जोशी व प्रा.वाय.एम.बोरसे यांनी मार्गदर्शन केले.