विद्यापीठात संरक्षण विषयक परिसंवादाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  देशाच्या सुरक्षिततेसाठी केवळ सैन्य किंवा सरकारवर जबाबदारी टाकून मोकळे होता येणार नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, असे प्रतिपादन भारताच्या गृह मंत्रालयाचे माजी सुरक्षा सल्लागर व सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचे माजी अध्यक्ष बिग्रेडीयर संजय अग्रवाल यांनी केले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळा अंतर्गत संरक्षणशास्त्र विभाग आणि विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “काश्मीर बाबत चीनचे धोरण ” या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ब्रिगेडीअर संजय अग्रवाल  बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी.इंगळे होते. यावेळी मंचावर युआयसीटी चे संचालक डॉ.जे.बी.नाईक, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ.अनिल चिकाटे, समन्वयक प्रा.तुषार देशपांडे व समन्वयक सचिव डॉ.तुषार रायसिंग यांची  उपस्थिती होती.

 

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी नागरिकांकडून इंटरनेटची सुविधा पुरवून देशकार्याला हातभार लावला गेला.  सामान्य नागरिकांच्या सहभागाने देशाच्या रणनितीची प्रतिमा तयार होत असते.  तरुणांनी आपल्या बौध्दिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले. उद्घाटनानंतरच्या बीजभाषणात त्यांनी काश्मीरसाठी चीनची धोरणात्मक योजना कशी आहे यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे प्रकाश टाकला. चीन भूभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काश्मीर मधील ३७० कलम हटविल्यानंतर चीनने विरोध दर्शविला. कुरापती काढण्यात चीनसोबत भारताच्या शेजारी देशांचाही सहभाग आहे.  भारत अत्यंत शांतपणे मात्र रणनितीने प्रत्यत्तर देत आहे.  कोणाच्याही अधिपत्याखाली न जाता भारत स्वत:चे स्थान आणि अधिपत्य घडवत आहे असे ते म्हणाले. राष्ट्रीय इच्छाशक्ती, राष्ट्रीय हेतू आणि राष्ट्रीय क्षमता यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

अध्यक्षीय भाषणात प्रा.एस.टी.इंगळे यांनी देशाच्या सीमेवर अस्वस्थता माजवली जाते.  दहशतवादामुळे सीमेवरचे प्रश्न चिघळत असतात.  काळाच्या ओघात युध्दांमध्येही आता बदल झाले आहेत.  जैवीक शस्त्रे वापरली जातात.  या सगळया पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले.  प्रारंभी डॉ.अनिल चिकाटे, प्रा.जे.बी.नाईक आणि डॉ.तुषार रायसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी व आभार प्रा.वीणा महाजन यांनी मानले.

 

दुपारच्या सत्रात दक्षिण कोरीयाच्या एशिया इन्‍स्टीटयूट, सेऊलचे संचालक डॉ.लखवींदर सिंग, इंडीयन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअरर्सच्या डॉ.अनघा गुहा रॉय, पुणे येथील शैबल बॅनर्जी यांची व्याख्याने झाली.

Protected Content