विदर्भात तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता

 

पुणे : वृत्तसंस्था । हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यानंतर आता विदर्भातही   पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे.

 

काल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर १९ फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

 

 

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

१८  तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र,  २०  तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.

Protected Content