विजय लुल्हे राज्यस्तरीय पर्यावरणमित्र पुरस्काराने सन्मानित

जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील तरसोद येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक विजय लुल्हे यांना पर्यावरणमित्र पुरस्कार आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.

 

राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, पी. ई. पाटील, ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, खलिल शेख, प्रतिभा सुर्वे, प्रा. गोपाळ दर्जी, राजनंदिनी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाने बीजारोपण, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षदान, प्रदूषणमुक्त सार्वजनिक होळी, ग्रामस्वच्छता अभियान, सार्वजनिक स्थळांची सफाई करणे, तंबाखूमुक्त अभियान, आदी उपक्रम श्री. लुल्हे यांनी राबविले. पर्यावरणप्रेमी, पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे व निसर्ग अभ्यासक (स्व.) दिलीप यार्दी यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. सातपुडा बचाव कृती समिती, शिवाजी उद्यान बचाव समिती सदस्य म्हणूनही सहभाग दिला. सातपुडा जंगलातील वृक्षतोडीवर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, त्याचप्रमाणे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान व शिवाजी उद्यान हे पक्षीविहार क्षेत्र घोषित करणे या मागण्यांसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावल अभयारण्याला वन्यजीव अधिवास धोका क्षेत्र घोषित करावे व त्याआधी आदिवासींचे पुनर्वसन करावे या मागण्यांसाठी श्री. लुल्हे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.  चला तार्‍यांना भेटू या ” हा तारांगण निरीक्षण तालुकास्तरीय अभियान आयोजनासह राबविणे आदी कामांची दखल घेऊन श्री. लुल्हे यांना राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी श्री. लुल्हे यांना पर्यावरण शाळेतर्फे किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हरित शिक्षक पुरस्कार, धुळे येथील निसर्गमित्र समितीतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय समाजाभिमुख व राष्ट्रीय उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार व रौप्य पदक प्राप्त झाले आहेत. श्री. लुल्हे पर्यावरण शाळा (जळगाव) , पक्षीमित्र संघटना (चिपळूण), मराठी विज्ञान परिषद (जळगाव ) या संस्थाचे आजीव सभासद व उडान पक्षीमित्र संघटना (अमळनेर ) व वन्यजीव संरक्षण संस्था (जळगाव) या संस्थांचे सदस्य आहेत. लुल्हे यांना पुरस्कार प्राप्त झाल्या प्रित्यर्थ त्यांचे विविध स्तरातून हार्दिक अभिनंदन होत आहे.

Protected Content