केंद्राने हस्तक्षेप करून मराठा आरक्षण स्थगिती उठवावी (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या घरासमोर चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाचे वतीने दि .२० रोजी सकाळी ११ वाजता ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात ५८ मुक मोर्चे शांततेत काढण्यात आले आरक्षणासाठी ४१ मराठा बांधवांनी आत्मबलीदान दिले आहे . मोठ्या संघर्षानंतर आरक्षण मिळाले होते.

मागील सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नेमून त्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. मागील दोन वर्षापासून मराठा आरक्षणाचा वाद कोर्टामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यातील आरक्षणाला स्थगिती न देता मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याची भावना राज्यात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या निकालानुसार पाच सदस्यीय घटनापीठाकडे मराठा आरक्षण हा विषय देऊन नोकरीविषयक व इतर आरक्षणाला स्थगिती दिली गेल्याने मराठा समाजात प्रचंड नाराजी आहे .

कोर्टामध्ये राज्यशासन बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून मराठा समाजाच्या मुलांना नोकरीमध्ये जाण्याची व उच्च शिक्षण घेण्याची संधी राज्य सरकार मुळे गेलेली आहे. त्यामुळे कोर्टामध्ये योग्य व भक्कम बाजू न मांडल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे समस्त मराठा समाज बांधवांकडून आम्ही तीव्र शब्दात राज्य व केंद्र शासनाचा निषेध करतो , असे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले .

केंद्र शासनाने EWS म्हणून 10 टक्के आरक्षण दिले.त्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली नाही. दक्षिणेकडील राज्यांनी केंद्राच्या परिशिष्ट ९ मध्ये आरक्षण विषय टाकुन घेतला. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही.म्हणून केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करावा तसेच खासदार नचिपन यांच्या अध्यक्षते खालील समितीचा अहवाल स्वीकारावा या न्यायय मागणीसाठी राज्यभर सत्ताधारी खासदार व मंत्र्यांना जागे करण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत आहे .

या आंदोलनाचा भाग म्हणून खासदार उन्मेष पाटील यांच्या घरासमोर चाळीसगाव मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करावा अन्यथा नव्या आंदोलनाचा गंभीर इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देत आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले .

यावेळी लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, पंकज रणदिवे, खुशाल पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आंदोलनात गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, पंकज रणदिवे, खुशाल पाटील, अरुण पाटील, संजय कापसे , भाऊसाहेब सोमवंशी, गोविंद चव्हाण, प्रशांत गायकवाड, सौरभ देवकर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/694172444788653/

Protected Content