विकास दुबेला चकमकीत ठार मारण्याची शक्यता ; सुप्रीम कोर्टात आधीच दाखल होती याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कुख्यात गुंड विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने आज एका चकमकीत ठार केले. परंतू पोलीस विकास दुबेला चकमकीत ठार मारतील अशी भीती व्यक्त करणारी याचिका सर्वोच्च न्यायालायत आधीच दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका सुनाणीसाठी येण्याआधीच विकास दुबे ठार झाला आहे.

 

लाइव लॉने यासंबंधी दिलेल्या वृत्तानुसार घनश्याम उपाध्याय या वकिलाने ही याचिका केली होती. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात विकास दुबेला सुरक्षा दिली जावी अशी मागणी केली होती. विकास दुबेच्या साथीदारांची खोट्या चकमकीत हत्या करण्यात आली आहे. याचिकाकर्त्या वकिलाने गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशात झालेल्या चकमकींची माहितीही याचिकेत दिली आहे. वकिलाने विकास दुबेचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणीही केली होती. विकास दुबेला सुरक्षा पुरवली जावी आणि चकमकीत त्याला ठार करणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजना करत काळजी घेण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारला द्यावेत. न्यायालयात दिलेल्या तारखेला त्याला हजर करण्यासाठीही सुरक्षा पुरवली जावी. तसेच विकास दुबेचे घर पाडल्याबद्दल तसेच साथीदारांची हत्या केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणी देखील याचिकाकर्त्या वकिलाने केली होती. पण ही याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर येण्याआधीच विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला येत असताना त्याला ठार करण्यात आले.

Protected Content