मुंबई : वृत्तसंस्था । आता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, पीयूसी ठेवण्याची आवश्यकता नाही. परिवहन विभाग डिजिटल करण्याच्या दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. आता कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ग्राह्य धरली जाणार आहेत.
याबाबत भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अध्यादेश जारी केला आहे. ज्याची १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता फक्त कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही. वाहन चालकांना मोबाइलमधील कॉपी दाखवता येतील. या डिजिटल कॉपी M-Parivahan किंवा digilocker app मध्ये जतन करता येतील,
नियम भंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलीसांनी वाहन परवाना जप्त करणे किंवा रद्द करण्याची कारवाई केली तर ती कारवाई त्यांना ऑनलाइन करावी लागेल. पोलिसांना डिजिटल पोर्टलवर तक्रार द्यावी लागले.ऑनलाइन त्याची नोंद घेतली जाणार आहे. पोलिसांकडून आता परवाना ताब्यात घेतला जाणार नाही.
कायद्यातील सुधारणा वाहन चालकांसाठी नाक्यानाक्यावरील चिरीमिरीपासून सुटका करणाऱ्या ठरणार होणार आहे. मात्र कारवाईसुद्धा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे हिताचे राहील, ट्राफिक नियमांचे उल्लंघन केले तर संपूर्ण माहिती ट्राफिक पोलिसाला द्यावी लागणार आहे. ज्याची नोंद थेट ऑनलाइन होणार आहे. चहापाणी किंवा चिरीमिरीसाठी होणारी तडजोड आता करावी लागणार नाही.
वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे महागात पडू शकते. वाहन परवाना रद्द होणे किंवा जबर दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे किंवा व्हिडीओ पाहण्यावर निर्बंध असून नेव्हिगेशनसाठी वापर करण्यास मुभा आहे.
आजपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद पोर्टलद्वारे केली जाणार आहे. वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी पोर्टलद्वारे केली जाणार आहे.डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असणार आहे.