पैठण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील वारकर्यांसाठी लवकरच स्वतंत्र बँक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आज मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे.
संदीपान भुमरे यांनी पैठण येथे दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला संत-महंतांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित महंतांनी मठांचा विकास करण्याची यावेळी मागणी केली. याला उत्तर देतांना संदिपान भूमरे म्हणाले की, प्रत्येक मठाला भेट देऊन त्याच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. पैठण घाटावरती आरती, एकनाथी भागवत मंदिर आणि वारकर्यांसाठी स्वंतत्र बँक सुरु करु, असं आश्वासन भूमरेंनी दिले. ही बँक स्वतंत्रपणे वारकर्यांसाठी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
संदीपान भुमरे यांनी केलेली ही घोषणा अतिशय महत्वाची मानली जात आहे. या स्नेहमिलनासाठी संत ज्ञानेश्वर संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, शिवानंद महाराज शास्त्री, भवर महाराज, नामदेव पोकळे महाराज, विठ्ठल शास्त्री चनघटे महाराज यांच्यासह संत-महंतांची उपस्थिती होती.