जळगाव, प्रतिनिधी । या. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका वर्षा अहिरराव लिखित निवडक निबंध भाग- ३ च्या पुस्तकाचे प्रकाशन माजी कुलगुरू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्वज्ञान , निसर्गवर्णन , समाजशास्र , व्यवहारशास्र ही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखनाची यशस्वी चतुःसूत्री होती, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू पी. पी. पाटील यांनी केले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या वतीने मंगळवार २४ ऑगस्ट रोजी माजी कुलगुरू पी. पी. पाटील यांच्या निवासस्थानी पुस्तक प्रकाशन सोहळा झाला, त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर , कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी ,कार्यक्रमाचे संयोजक तथा पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे ,श्रीवरद सुतार ,अंकित पाटील प्रमुख अतिथी होते. माजी कुलगुरू पाटील म्हणाले की , प्रत्येक विद्यार्थिनी व तरुणींमधून आधुनिक बहिणाबाई चौधरी निर्माण होणे काळाची गरज आहे. बहिणाबाईंच्या कवितांच्या अनुषंगाने भावमूल्यात्मक जीवन मार्गदर्शक लेखन वर्षा अहिररावांनी करावे ,असे आवाहनही त्यांनी केले.
सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू ( स्व.) सुधीर मेश्राम यांच्या पत्नी ज्योत्स्ना मेश्राम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुस्तक प्रकाशनाचे औचित्य साधून व ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने निबंधकार वर्षा अहिरराव यांचा पुस्तक भिशीतर्फे माजी कुलगुरू पाटील यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. भिशीचे सदस्य तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनील दाभाडे यांना विश्वशांती विषयांतर्गत ऑनलाइन पेंटिंगच्या योगदानाबद्दल गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचे पदक व प्रमाणपत्र माजी कुलगुरू पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीचे औचित्य साधून चित्रकार दाभाडे यांनी तव्यावर रेखाटलेल्या सुप्रसिद्ध बहिणाबाईंची कविता ‘ अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर ’ चे सृजनशील शब्द रेखाटन केलेल्या सचित्र पेंटिंगचे माजी कुलगुरू पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अनिता पाटील यांनी बहिणाबाईंची ‘अरे संसार संसार’ कविता भावविभोरपणे सादर करून उत्फूर्त प्रतिसाद दिला. वर्षा अहिरराव यांनी, निबंध म्हणजे संवेदनशील व उत्कट अनुभवांची उत्स्फूर्त अभिव्यक्ती असून, निरंतर वाचन, चिंतन, मनन आणि लेखनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. विजय लुल्हे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. पुस्तक भिशीचे संस्थापक मार्गदर्शक आप्पासाहेब नीळकंठ गायकवाड, सुप्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी , सदरहू पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत पब्लिकेशन्सचे रंगराव पाटील , विजया अहिरराव, प्रसाद अहिरराव यांनी मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी भिशीच्या सदस्या उषा सोनार , विशाखा देशमुख, केंद्रप्रमुख कवी अरुण वांद्रे, महेश बच्छाव , मुख्याध्यापक मनोहर खोंडे, सुनील महाजन, प्रशांत पाटील, दीपक पाटील, सुनील महाजन यांनी सहकार्य केले.