चाळीसगाव,प्रतिनिधी| अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकतीच राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. यामुळे वनविभागाच्या पट्यात मोडणाऱ्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने निवेदनाद्वारे केली आहे.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दाखल घेत राज्य सरकारने नुकतीच नुकसानग्रास्थांना मदत जाहीर केली. मात्र वनविभागाच्या पट्यात मोडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत जाहीर न झाल्यामुळे त्यांनाही तातडीने मदत जाहीर करा अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोकसंघर्ष मोर्चाने निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे केले आहे. निवेदनात नुकसान भरपाई हि फक्त ७/१२ उतारा धारक शेतकऱ्यांनाच मंजूर केली आहे. मात्र वन पट्टे धारकांना व प्रलंबित आणि अपील मध्ये असणाऱ्या दावे धारकांना नुकसान भरपाईचा उल्लेख नाही. हा आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय असून जमिनीचे मालक असूनही ह्या कायदेशीर हक्काला यामुळे अडचण येवू शकते. असे नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन हे लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली कारभारी पवार, प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी, गौतम निकम, ममराज जाधव, चंद्रमनी सूर्यवंशी आदींनी दिले आहे.