मुंबई : वृत्तसंस्था । वंचित बहुजन आघाडीने राज्यातील वाढती इंधन दरवाढ आणि गगनाला भिडणारी महागाईविरोधात मुंबई भागातील प्रत्येक तालुक्यात उद्या आंदोलनाची घोषणा केलीय.
मुंबईतील प्रत्येक तालुक्यात वंचितचे कार्यकर्ते 21 जूनरोजी सकाळी आंदोलन करणार आहे. एकीकडे कोरोनाने जीव जात आहेत आणि दुसरीकडे यातून जे वाचले त्यांचं जगणं महागाईने असह्य केलंय. नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीय, असंही मत वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केलंय
वंचितने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, “आपण सर्वजण सध्या न भूतो अशी महागाईची झळ झेलत आहोत. कोरोना काळातील जीवघेणी अवस्था चालू असताना आत्ता त्यात महागाईची समस्या सुद्धा भोगत आहोत. यामुळे कोरोनातून जे जगलेत त्यांचे जीवनही असह्य केले आहे. वैद्यकीय खर्चात आपली या महामारीत लूट झालीच आहे व आत्ता स्वस्त किमतीत जीवनावश्यक वस्तू पुरवणे तर दूरच पण त्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या महामारित पोषक आहार घेवून रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याऐवजी उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कित्येकांच्या होत्या त्या नोकऱ्याही गेल्या.”
“संचारबंदी नियम पाळून धंदा उद्योगही करता येत नाही, पण सरकार वेगवेगळ्या बहाण्याने दंडाच्या नावाने सामान्य नागरिकांची लूट करत आहे. म्हणून झोपलेल्या व निर्दयी मोदी सरकार आणि महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मुंबईच्या पातळीवर दोन्ही सरकारच्या धोरणांचा व त्यामुळे वाढलेल्या महागाईचा तीव्र जाहीर निषेध आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मुंबईतील सर्व तालुक्यात कोरोना संबंधिच्या शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझर असे नियम पाळून जाहीर पद्धतीने केले जाणार आहे,” असंही वंचितने सांगितलं.
आंदोलनानंतर वंचितचे कार्यकर्ते संबंधित तालुक्यातील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन महागाई त्वरित कमी करून नियंत्रणात आणावी अशी मागणी करणारं पत्र देणार आहोत.