धरणगाव (प्रतिनिधी) पाल आले… जत्रा भरली…. पालं हलली… जत्रा उठली. दरवर्षी चैतन्य घेऊन येणारे पाल नुसते दोन पैसे कमविण्यासाठी येत नाहीत तर, समरसतेचा संदेश देऊन जातात. जेथे झेंडे नि रंग वस्त्यांना आगी लावत सुटतात तिथे जत्रा समरसतेचा संदेश पोहोचवून जाते.
आठवडाभर चाललेली जत्रा गावाने भरवली पण ती सजवली वेगवेगळ्या गाव-शहरातून आलेल्या पालांनी म्हणजे दुकानदारांनी! हे पालवाले होते. मणी, पोत, कानातले विकणारे वैदू, जोहरी,सोनार. चाळण्या, पत्र्याच्या वस्तू विकणारे फकीर, पिंजारी ,मौला. भांडी, खेळणी विकणारे कासार, वाणी . लोखंडी रैक आदीचे दुकान थाटणारे पांचाळ, लोहार, सिकलकर. माठ, खापर आदी मातीची भांडी घेऊन आलेले कुंभार . डाळ-मुरमुरे,रेवड्यावाले भोई. जिलबी, शेव, चिवड्याचा घमघमाट असलेलं हलवायांच्या दुकानांची रेलचेल आणि मनोरंजनासाठी आलेला तमाशाने रात्र जागवली बाळगोपाळांनी. अाणखीही बरीच दुकाने होती. पालं आली तशी आपली जागा बळकवण्याची सगळ्यांनाच घाई. जत्रेतली प्रत्येकाची जागा ठरलेली. ती जागा सोडून कोणीच बसत नाही. पहिले दोन दिवस जागेवरून वाद होतात आणि मिटतातही. आपल्या जागेवर दुसरा कोणी बसला तर भानगडी होतात, वाद टोकालाही जातात पण ऐडजस्ट करतात पण कोणीच जत्रा सोडून जात नाही. पूर्वीची जागा मोठी होती तर आता छोट्या जागेत भागवलं जातं. एकाचं दुकान दुसऱ्याची सावली होते. एकाच कुटुंबातील अनेकांची दुकाने असतात. जत्रेत बहुदा एका जत्रेतून दुसऱ्या जत्रेत दुकान थाटणारेच बहुतेक असतात. जत्रेत दाटीवाटी झाली तर दुकानदार खुशीत. त्यांना सुटसुटीत जत्रा नको वाटते. गर्दीचं गुपीत त्यांनाच माहिती. हे सगळे दुकानदार कमालीचे सहनशील असतात. आमच्या गावच्या जत्रेत दुकानदारांची आपापसात भानगड कधी ऐकीवात नाही. इथून आणखी कुठेतरी हे पाल जातील…जत्रा सजवणारे हे बलुतेदार पिढ्यानपिढ्या भेदाच्या भिंती पाडून दुकान मांडतांना दिसतात. जत्रा उठेपर्यंत हसत वावरतात… वैदू शेजारी सोनार, भोयाशेजारी जोहरी, कासाराशेजारी फकीर, पिंजारी…… यापेक्षा समरसता वेगळी काय असते… !
नवरानवरीची, रोंदयसोंदयची जत्रा
या मंदिराची अख्यायिका मोठी रंजक आहे. कोल्हापूरचा राजपुत्र आणि ग्वाल्हेरच्या राजकन्येचा विवाह आटोपून वरात या प्रदेशातून कोल्हापूरला परतत होती. तेव्हा हे दाट झाडीचे जंगल होते असे सांगतात. जंगलातून जाणाऱ्या या रस्त्याला लागून एक छोटंसं तळं होतं. तळ्याच्या काठावर रिद्धि सिद्धि चं (या भागात त्याला रोंदय सोंदय म्हणतात)मंदिर होतं. वरातीच्या बैलगाड्या तळ्याच्या काठावरच सुटल्या. काठावरच्या दगडावर दगडं मांडून चुलांगण तयार होऊन स्वयंपाकाला सुरुवात झाली. वरण भात तयार झाला नि गोवऱ्यांच्या विस्तवावर गव्हाच्या पिठापासून तयार बट्टी शेकायला सुरुवात झाली आणि अचानक त्या काळ्याशार दगडावर हालचाल होऊन तो खाली खचू लागला. दगड इतक्या गतीने तळ्यात बुडाला की नवरदेव नवरीसह वरातीमधील अनेक जन तळ्यात बुडू लागले. त्यावेळी प्रसंगावधान राखून न्हाव्याने नवरानवरीला खांद्यावर घेतले पण पाण्याबाहेर काढण्यात यश आले नाही बैलगाडीसह वरात पाण्यात बुडाली. पाण्यात गडप झाला तो दगड नव्हता तर एक भले मोठे कासव होते. स्वयंपाक करतांना चटके बसू लागल्याने ते पाण्यात गेल्याचे सांगतात.
या घटनेत जे वाचले त्यांनी राजवंशातील या नरदेव व नवरीचे येथेच मंदिर बांधले. रिद्धि सिद्धीचे मंदीर पूर्वीपासून होतेच. त्यात नवरानवरीची मुर्ती बसविण्यात आली तेव्हापासून हे कोणत्याही देवादिकाचे मंदिर नसून पाण्यात बुडालेल्या नवरानवरीचे आहे.
या कथेला जोडून आणखी एक पौराणीक कथा आहे. पूर्वी आपला महाराष्ट्र म्हणजे दंडकारण्य होते. तेव्हापासून या परिसरात हे तळं होतं. येथून गरम पाण्याचा प्रवाह भुगर्भातून बाहेर येत होता. त्वचेच्या विकार असलेल्याने या पाण्यात आंघोळ केल्याने तो आजार बरा होत असे. त्याकाळी जंगलांमध्ये ऋषी मुनींचा वास होता. शरभंग ऋषी त्यापैकी एक . त्यांना त्वचा विकार होता. त्यांनी या पाण्यात आंघोळ केल्याने त्यांचा तो आजार बरा झाला.कालांतराने पाण्याची पातळी खालावल्याने पाण्याचा प्रवाह आटला. १८-२० वर्षापूर्वी पद्मालय येथील भीमकुंडावरून एक बाबा आले. त्यांनी मंदिर सुघारणेला प्रारंभ केला. पाणी टंचाई लक्षात घेऊन तळ्याच्या काठावर त्यांनी बोअर केला. त्याला गरम पाणी लागलं. येथे तळ्यात गरम पाणी होते ही कथा सत्यात अवतरली. बाबांमुळे या देवस्थानचा कायापालट झाला.
तळ्याच्या काठावर असलेल्या रिद्धि सिद्धी म्हणजेच रोंदय सोंदय समोर भाविक इच्छा व्यक्त करतात. ती इच्छा पूर्ती झाल्यावर ते येथे नवस फेडायला येतात. अशा नवस फेडणाऱ्यांची पौष महिन्यात येथे वर्दड वाढल्याने पुढे पुढे त्याला जत्रेचं स्वरुप आलं. पौष अमावस्येला हि जत्रा असते. कष्टकरी शेतमजुर- शेतकऱी समाजाची हि जत्रा यात थेट मध्यप्रदेश,गुजरात प्रांतातील आदिवासी बांधव येतात.