मुख्यमंत्री – अण्णा हजारे यांच्यात बंदद्वार चर्चा

राळेगणसिद्धि ( वृत्तसंस्था) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अण्णांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न फोल ठरल्यानंतर आज स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे ही उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असून सरकार अण्णांच्या मागण्यांची दखल घेणार का, तसेच अण्णांची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून यापूर्वीही गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांनी शिष्टाईचे प्रयत्न केले होते. परंतु, ते फोल ठरले. अण्णा मागण्या मान्य करून घेण्यावर ठाम असून त्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे अखेर आज उपोषणाच्या सातव्या दिवशी स्वत: मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.

Add Comment

Protected Content