शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील भागवत कथेमध्ये श्री लोकेशानंदजी महाराजांच्या श्रीकृष्ण जन्मकथेने भाविकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केल्याचे दिसून आले.
प्रतिपंढरपूर शेंदूर्णी नगरीत गेल्या सहा दिवसापासून श्रीमद भागवत कथा येथील बारी मंगल कार्यालयात सुरू आहे. यात कथाकार श्री.नारायण पंथाचे स्वामी लोकेशानंद महाराज यांनी आज आपल्या अमृत वाणीतून भगवान श्रीकृष्ण जन्मकथा सांगितली. या कथेने उपस्थित भाविकांच्या काळजाचा ठाव घेतला.
लोकेशानंदजी यांनी श्रीकृष्ण जन्माआधी मामा कंसने स्वतःच्या मृत्युच्या भीतीने वासुदेव देवकी यांना बंदी गृहात टाकून त्यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या सात भाऊंचा जीव घेतला आठवे श्रीकृष्ण जन्मले त्यांना वासुदेवाने गोकुळात सोडले व यशोदेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला देवकीच्या स्वाधीन केले परंतु तिचाही प्राण घेण्यासाठी कंसाने प्रयत्न केला हे कथेतून सांगितले. भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाने अनेक प्रयत्न केले परंतु प्रभुलीला अपरंपार आहे.यावेळी श्रीकृष्ण अवतार लीला कथनाचे अनेक प्रसंग महाराजांनी आपल्या वाणीतून सांगितले. त्यानंतर युवक आपल्या देशाची शक्ती असून ते सुसंस्कारित घडण्यासाठी श्री.नारायण पंथाचे युवा युवा गीत ऐकवले. महाराजांनी आजच्या कथेत गायीचे महत्व पटवून देतांना प्रत्येक हिंदुच्या कुटुंबात घरी एक तरी गाय असावी असे सांगितले.
श्रीमद भागवत कथाकार लोकेशानंद स्वामी यांनी शेंदूर्णी पावन भूमीचे महत्व सांगतांना शेंदूर्णी नगरीला प्रति पंढरपूर म्हणून ज्या भगवान त्रिविक्रम मंदिरामुळे म्हटले जाते त्या मंदिराचे पावित्र्य जपतांना मंदिराला व धार्मिक क्षेत्राला साजेसे मंदिर निर्माण करायचा व भगवान त्रिविक्रम लौकिक सर्व दूर देशात पसरवण्याचा संकल्प शेंदूर्णी नगरीतील भाविक भक्तांमुळे पूर्णत्वास येईल असा संकल्प व आशावाद व्यक्त केला शेवटी भगवान नारायण आरती करण्यात आली.