रावेर, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावमुळे लॉकडाऊन 0.2 लावण्यात आला आहे. रावेर तालुक्यात हातावर पोट असणारे कुटुंब मोठ्या प्रमाणात आहे. अश्या कुटुंबाना मागील वर्षी स्थानिक प्रशासनाने व्यापा-यां कडून धान्य जमा करून त्याचे किट्स तयार करून गरीब कुटुंबाना वाटप केले होते. परंतु यावर्षी कुठेही गरीब कुटुंबाना किट्स वाटप करतांना किंवा व्यापा-यांना अवाहन करतांना प्रशासन दिसले नाही.
मागील वर्षी कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते. अनेकांच्या हाताला काम नसल्याने हातावर पोट असणा-या कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून शासनाने व्यापारी, विविध संस्थाना मदतीचे अवाहन केले होते व गरीब कुटुंबाना वेग-वेगळे धान्याचे किट्स तयार करून वाटप करण्यात आले होते. यावर्षी देखिल स्थिती सारखी आहे.तालुका पूर्ण थांबला असतांना गरीब कुटुंबाना पुन्हा मदत करण्याची गरज आहे. मात्र अद्याप किट्स संदर्भात स्थानिक शासना गंभीर दिसत नाही.
मोफतचे धान्य अजुन प्राप्त नाही
लॉकडाऊन लागुन सहा दिवस उलटले आहे.शासनाने एका महिन्याचे मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते.परंतु अजुन नियतनच प्राप्त नाही त्यात कोरोनात लाभार्थांचा थंब घ्यायचा किंवा नाही यात संभ्रम पसरला आहे.सद्या नियमित धान्य वाटप सुरु आहे. मोफतचे धान्य गोडाऊनमध्ये अद्याप प्राप्त नसल्याचे पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी सांगितले.
तहसिलकडे सुमारे पाऊणे आठ लाख जमा
रावेर ग्रामीण रग्णालयात ड्यूरो ऑक्सिजन सिलेंडर बसविण्यासाठी तालुक्यातील विविध दानशुरांनी सुमारे पाऊणे आठ लाखाचा निधी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे जमा आहे. यात मागील वर्षीचे २८ हजार शिल्लक असा एकूण ७ लाख ७५ हजार ३५३ रुपये विविध दानशुरांनी दिलेल्या निधितुन जमा झाला आहे.यातुन ड्यूरो सिलेंडर उभारण्यात येणार आहे.