नि:शब्द : एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू !

सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी । कोविडच्या आपत्तीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतांना दिसून येत आहे. यात सावद्यातील परदेशी कुटुंबातील पाच जणांचे कोरोनाने तर एका महिलेने मानसिक धक्क्यामुळे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. याच कुटुंबातील महिलेचा आज जळगाव शहरातील सारा हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबातील मुले अक्षरश: उघड्यावर आली आहेत. अवघ्या ४० दिवसांमध्ये या परिवाराचे होत्याचे नव्हते झाल्याने परिसर सुन्न झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, सावदा येथील प्रतिभा कैलाससिंह परदेशी (वय ४८) या महिलेचा आज जळगावातील सारा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. ऑक्सीजन संपल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मुलांनी केला आहे. याची दखल घेत महापौर व उपमहापौरांनी हॉस्पीटलला भेट देऊन माहिती जाणून घेत त्यांना संबंधीतांवर कारवाईची ग्वाही दिली आहे. यात पुढे काय होईल ते होईल. मात्र यातून सावदा येथील परदेशी कुटुंबावरील भयंकर आघाताने परिसर सुन्न झालेला आहे. या एकाच कुटुंबात ४० दिवसांमधील हा सहावा मृत्यू आहे.

सावदा येथील परदेशी कुटुंब हे कर्तबगार आणि प्रतिष्ठीत असे मानले जाते. या कुटुंबातील पत्रकार म्हणून कार्यरत असणारे कैलाससिंह गणपसिंह परदेशी (वय५५) यांचे गेल्या महिन्यात २५ तारखेला कोरोनाचा उपचार सुरू असतांना निधन झाले होते. तर, त्यांचे बंधू तथा एलआयसी एजंट किशोर गणपतसिंह परदेशी (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता किशोर सिंह परदेशी (वय ४८) यांचे देखील कोविडच्या संसर्गावरील उपचार सुरू असतांना अनुक्रमे २१ मार्च आणि २५ मार्च रोजी निधन झाले. तर कैलाससिंह आणि किशोर परदेशी यांच्या मातोश्री कुवरबाई गणपतसिंह परदेशी यांचा अन्य व्याधीवर उपचार सुरू असतांना निधन झाले. अवघ्या चार दिवसात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसर अक्षरश: स्तब्ध झाला होता.

यानंतर याच कुटुंबातील राजेंद्र गणपसिंह परदेशी यांचा कोरोनाने ३१ मार्च रोजी मृत्यू झाला. यानंतर या कुटुंबातील प्रतिभा कैलाससिंह परदेशी यांच्यावर सारा मल्टी-स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या उपचारांना प्रतिसाद देखील देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या जेवण देखील घेत होता. मात्र त्यांना त्यांच्या कुटुंबातील मुलांनी इतरांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील दिली नव्हती. येत्या काही दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी मुलांना अपेक्षा होती. तथापि, आज आकस्मीकपणे प्रतिभा परदेशी यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबाला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

कैलाससिंह परदेशी यांचा जनसंपर्क दांडगा असून दैनिक सामनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडली होती. तर त्यांचे बंधू किशोर हे देखील एलआयसीमध्ये असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. हे कुटुंब परिसरात प्रतिष्ठीत म्हणून गणले जाते. यामुळे एकाच कुटुंबातील सहा कर्त्या स्त्री-पुरूषांचा मृत्यू झाल्याने आता मुले व मुली उघड्यावर आलेली आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.