थयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही — मुख्यमंत्री खट्टर

 

 

 

चंदीगड: वृत्तसंस्था । हरियाणात कोरोनाबळींचा आकडा वाढत असताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. थयथयाट केल्याने मेलेले लोक परत येणार नाहीत. हे नैसर्गिक संकट आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं विधान त्यांनी  केलं आहे.

 

खट्टर यांच्या या विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनोहर लाल खट्टर रुग्णालयात आले होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना मृतांच्या आकड्यांवरून प्रश्न विचारला असता संतप्त झालेल्या खट्टर यांनी हे धक्कादायक विधान केलं. मैत्री संबंधामुळे कोरोनाच्या रुग्णांचे आकडे आम्ही मीडियाला देत असल्याचं जनसंपर्क अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. जनतेला उत्तर देण्याची  जबाबदारी नाही का ?, असा सवाल या पत्रकाराने खट्टर यांना केला. त्यावर, ही वेळ आकड्यांवर लक्ष ठेवण्याची नाहीये. ज्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या थयथयाटाने जिवंत होणार नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं खट्टर म्हणाले.

 

 

यापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात  त्यांनी कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं व  घातक असली तरी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हरियाणा सरकार तयार आहे, असं ते म्हणाले होते. लॉकडाऊनबाबतही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. त्यामुळे लोक अधिकच पॅनिक होतील.  लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला येते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

 

राज्यातील आरोग्य सुविधांवर आम्ही लक्ष देत आहोत. आमच्याकडे पुरेसे बेड्स आणि व्हेंटिलेटर आहेत. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, असं सांगतानाच चार दिवसात 5 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं टार्गेट आम्ही ठेवल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Protected Content