लॉकडाऊनचा पहिला दिवस बऱ्यापैकी यशस्वी; पोलीसांचा कडक बंदोबस्त (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । आज लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील चौकाचौकात पोलिसांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी डबल सीट आणि चारचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली तर हुज्जत घालणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले होते. दरम्यान, लॉकडाऊनचा पहिला दिवस बऱ्यापैकी यशस्वी झाला. पोलिसांनी शहरातील जवळपास सर्वच भागात कडक बंदोबस्त आणि गस्त सुरू ठेवल्यामुळे हे शक्य झाले.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या साडेचार हजाराहून अधिक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जळगाव शहर, अमळनेर आणि भुसावळ शहर हॉटस्पॉट ठरले आहे. प्रशासनाच्या कालपर्यंतच्या अहवालानुसार जळगाव शहरात १ हजार १४, भुसावळ ४८२ आणि अमळनेर शहरात ३९० रूग्ण संख्या पोहचली असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवार ७ जुलै पासून १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला. आज सकाळपासून शहरातील ठिकठिकाणी व विविध चौकात पोलिसांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधिक्षक उतरले रस्त्यावर
आज सकाळपासून जळगाव शहरातील विविध चौकात पोलिसांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर वाहनांनाही बंदी आहे. असे असतांनाही दुचाकीवरून दोन जण जात असल्याने पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी थांबविले. दुचाकीस्वार पोलिसांशी हुज्जत घालत असल्याने स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी चारचाकीतुन उतरुन संबंधित दुचाकीस्वाराचा चांगला समाचार घेतला. व जिल्हापेठ पोलिसांना संबंधित दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

डीएसपी चौकात रामानंद पोलिसांची गस्त
शहरातील कव्यरत्नावली चौक आणि डीएसपी चौकात पोलीसांकडून वाहनांची कडक तपासणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे रस्त्यावर उतरून प्रत्येक वाहनांची तपासणी करत होते. महाबळ, संभाजी नगर, रामानंद नगर, समता नगर भागात राहणारे शासकीय कर्मचारी यांनाच जाण्याची मुभा होती. विशेष म्हणजे एका दुचाकीवर एकच जण जाता येणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली होती. काहींना चौकापासून थेट कार्यालयापर्यंत पायी जावे लागले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची तपासणी
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळी कोर्ट चौकात नवीन बसस्थानक आणि गणेश कॉलनीतून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. यावेळी दुचाकीवर डबल सीटसाठी मज्जाव करण्यात आला. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. अत्यावश्यक सेवा वगळता यावेळी कोणत्याही वाहनधारकास जाण्यास साफ मनाई केली होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1723102257830427/

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/604840913799985/

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/270276214069726/

Protected Content