जळगाव, प्रतिनिधी । येथील नागरिकांनी महापालिका हद्दीत सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा कामाच्या आराखड्यात इच्छादेवी मंदिर चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाच्या खालील दोन्ही बाजूंनी भुयारी मार्ग (अंडर पास) बनविण्याची मागणी न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे.
जळगाव महापालिका हद्दीत आठ किलोमीटर अंतरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामाच्या आराखड्यात इच्छादेवी मंदिर चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाच्या खालील दोन्ही बाजूंनी भुयारी मार्ग (अंडर पास) तयार करणे अत्यावश्यक आहे. कारण,मेहरुण आणि त्यात लगतच्या भागाची लोकसंख्या ४० ते ४५ हजार एवढी आहे. या रहिवाशांना दररोज राष्ट्रीय महामार्ग ओलांडून मुख्य शहरात जावे लागते. यापूर्वी महामार्ग ओलांडताना अनेकदा अपघात होऊन अनेकांचे हकनाक बळी गेलेले आहेत. या भागात शाळा-महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांना जोखीम पत्करून महामार्ग ओलांडावा लागतो. शिवाय महामार्गाच्या पलीकडे कासमवाडी भागात शनिवारी तर अलीकडे अक्सा नगर भागात बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. त्यात खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आताच्या आराखड्यानुसार इच्छादेवी मंदिर चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान महामार्ग ओलांडण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नागरिकांना उपलब्ध नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता इच्छादेवी मंदिर चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाच्या खालील दोन्ही बाजूंनी भुयारी मार्ग (अंडर पास) तयार करणे आवश्यक आहे. हे दोन बोगदे तयार झाल्यास ४० ते ४५ हजार नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी निर्धोक मार्ग उपलब्ध होऊ शकते. तात्काळ भुयारी मार्ग तयार करावेत अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर जमील शेख,रियाज बागवान (नगरसेवक), जफर शेख, अशफाक पिंजारी, बशीर भुराणी, डॉ.शरीफ बागवान, रिजवान जहागीरदार, अनिस शाह, दानिश सय्यद, मुजीब पटेल, मिन्हाज शेख, डॉ. रिज़वान खाटीक, इक़बाल वज़ीर, यूसुफ शेख़, आसिफ विच्छि, इलियास शेख, फहीम पटेल, यूसुफ रुस्तम, रऊफ खान आदींच्या स्वाक्षरी आहे.