सर्वांनी सामूहिक उपोषणाची तयारी करावी; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे. निवडणूक विषय संपलेला आहे. मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढला आहे. आता आरक्षणाची लढाई सुरू होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका झाल्या. राज्यात सध्या कुणाचे सरकार येणार? कोणती आघाडी सत्तेत असणार? कोण मुख्यमंत्री होणार? अशी चर्चा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही मैदानात नव्हतो, त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही. जर मी मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असता.

उमेदवार कोणताही निवडून आला म्हणजे तो काही मालक झाला नाही, त्याला मराठ्यांनी निवडून दिले आहे. मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे आता मराठे मला सांगणार आहेत. कोणत्याही उमेदवारांनी बेइमान होऊ नये. गद्दारी केली तर, तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

राज्याच्या वतीने आपण सामूहिक उपोषण लावले आहे, त्याची सर्वजणांनी तयारी करावी. उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाली की, घोषित करणार आहोत. गावात कुठेही आमरण उपोषण करायचं नाही, आमरण उपोषण अंतरवाली सराटीत करायचे आहे. आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले आहे. त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणीत उभे राहायचे आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Protected Content