लाॅकडाऊन : धरणगावात सामाजिक संस्थांनी केली गोरगरीबांची शिदोरीची व्यवस्था !

 

धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या लाॅकडाऊन कालावधीत कापसाच्या जिनिंग मिल, कारखाने, दुकाने, हाॅटेल, बाजारबंद पडल्याने या ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दोन वेळेच्या जेवणाचेही हाल होत आहे. अशा गरजू लोकांसाठी धरणगावातील मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनने जिवनावश्यक वस्तूंचे पॅकेट तयार करुन वाटप सुरु केली आहे.

 

धरणगावातील मुन्नादेवी आणि मंगलादेवी हे फाऊंडैशन गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असते. गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे. त्यांचा शालोपयोगी खर्च करणे, गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे यासाठी ही संस्था प्रयत्नरत राहते. या फाउंडेशनचे प्रमुख आधारस्तंभ, उद्योजक जिवनसिंह बयस यांनी सद्याच्या बिकट परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात पुढे केला.

 

कोरोना संकट काळातही या संस्थेने गरीबांसाठी मदत पॅकेट तयार केले आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. गहू ५ किलो, तांदूळ २ किलो, तुरदाळ १ किलो, तेल १ किलो, चवळी १/२ किलो, मिठ १ किलो. मिरची पावडर, गरम मसाला, हळद प्रत्येकी ५० ग्रॅम, बिस्किट पुडा १ असे पॅकेट प्रत्येक कुटुंबाला वितरीत करण्यात येत आहे. नागरीकांच्या गरजेची बारीक नोंद ठेवून ती त्यांच्यापर्यत प्रत्यक्षात पोहचवली जात आहे.

 

या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार श्री.देवरे, नायब तहसीलदार श्री. मोहळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जिवनसिंह बयस, मुकेश बयस, तेजेन्द्र चंदेल, दत्तूनाना चौधरी, विलास बायस, जीतू बायस, गणेश सूर्यवंशी, दुर्गेश बायस, प्रीतम बायस आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Protected Content