लाच घेणाऱ्या वरिष्ठ सहाय्यकास सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाकडून एक हजार रुपयांची लाच मागून स्विकारल्याप्रकरणी प्राथमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक विनायक वनजी बैसाणे वय ३८ रा. वाघ नगर याच्याविरुध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने संशयित वरिष्ठ सहाय्यकाला दोषी ठरवून ४ वर्षाची सक्तमजुरी व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबतत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रप्रमुख प्रभाकर अभिमन काटे हे मे २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाले. याठिकाणी कार्यरत असतांना काटे यांच्या सेवा पुस्तकात सन २०१०-२०११ या वर्षात गणवेश घोटाळा झाल्याची नोंद नजरचुकीने करण्यात आली होती. त्यामुळे काटे यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळण्यास अडचण येत होती. काटे यांच्या सेवा पुस्तकातील गणवेश घोटाळ्याची चुकीची नोंद रद्द होण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक विनायक वनजी बैसाणे रा. वाघनगर यांनी चुकीची नोंद रद्द होण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी दि.१९ सष्टेंबर २०१५ रोजी केली होती. त्यांनतर दि.२१ रोजी तक्रारदार प्रभाकर काटे यांच्याकडून १ हजार रुपयांची लाच स्विकारतांना वरिष्ठ सहाय्यक विनायक बैसाणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर शहर पोलीसात विनायक बैसाणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

लाच मागितल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे तक्रारदार प्रभाकार काटे, पंच अंकुश गवई, समक्ष अधिकारी असलेले तत्कालीन सीईओ आस्तिककुमार पांडे, तपासधिकारी पोली निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षी व पुराव्यांवरून तसेच सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड. मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. न्या. लाडेकर यांनी संशयित विनायक बैसाणे याला दोषी ठरवून लाच मागितल्याप्रकरणी ३ वर्ष, एक हजार रुपये दंड, तसेच लाच स्विकारल्याप्रकरणी ४ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी अनिल सपकाळे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनिल शिरसाठ यांनी सहकार्य केले.

Protected Content