नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोविड १९ प्रतिबंधक लस घेणाऱ्या व्यक्तीस संरक्षण मिळते, त्या व्यक्तीस संसर्ग गंभीर पातळीवर जात नाही. तरीही त्या व्यक्तीकडून इतरांना संसर्गाचा धोका कायम असतो, त्यामुळे लस घेतली म्हणून नियम पाळण्याची गरज नाही, असे नाही असा इशारा साथरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
लस दिलेल्या व्यक्तींपासून विषाणू पसरण्याची जोखीम जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लसीकरण हा साथरोगावरील उपायांमधील एक भाग आहे, असे असले तरी ते अंतिम उत्तर नाही, असे नवी दिल्लीच्या राष्ट्रीय रोगप्रतिबंध संस्थेचे डॉ. सत्यजित रथ यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या आयसरमधील साथरोगतज्ज्ञ विनिता बाळ यांनी सांगितले, की सध्या उपलब्ध असलेल्या कुठल्याही लशीपासून या रोगाचा प्रसार पूर्ण थांबण्याची शक्यता नाही. लसीकरणानंतरही पुन्हा कोरोना होऊ शकतो, फक्त त्याचे स्वरूप गंभीर नसते.
रथ यांनी सांगितले, की एखाद्या व्यक्तीला लस दिल्यानंतर त्या व्यक्तीत विषाणूला निष्क्रिय करणारे प्रतिपिंड तयार होतात. ते बराच काळ टिकतात. नंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो पण तो तीव्र रूप धारण करीत नाही. लशीला प्रतिकार करणारे ‘सार्स कोव्ह २’चे काही प्रकार आहेत, त्यात पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ज्यांना लस दिली आहे त्या व्यक्तींकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका टळत नाही.
लशीमुळे प्रसार कमी होत नाही. त्यासाठी सामाजिक अंतर व मुखपट्टीचा वापर हेच उपाय आहेत. बाळ यांनी सांगितले, की लसीमुळे कोविड संसर्गाची तीव्रता कमी होते, पण लस घेतल्याने पुन्हा संसर्ग होतच नाही असे म्हणात येत नाही. सतत रूप पालटणाऱ्या विषाणूंच्या बाबतीतही हेच सत्य असून लसीकरणामुळे परिस्थिती गंभीर रूप धारण करत नाही. त्यामुळे लसीकरण महत्त्वाचे आहे. पण असे असले तरी मुखपट्टी व सामाजिक अंतर, साबणाने हात धुणे हे उपाय वापरावेच लागतात.