लष्करातील जवानांच्या मदतीसाठी लडाख सीमा भागांमधील गावकरीही पुढे

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी दिवस-रात्र जागता पाहरा देणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांसाठी आता लडाख सीमा भागांमधील गावकरीही पुढे सरसावले आहेत. स्थानिकांकडून भारतीय लष्करासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी पाठवल्या जात आहे

गावकरी वाळवलेलं कोरडं पनीर मोठ्या मोठ्या पिशव्यांमध्ये भरुन सैनिकांसाठी पाठवत आहेत. स्थानिक भाषेमध्ये या पनीरला छुर्पे असं म्हणतात. हा पनीरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन्स असतात जे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तसेच हे पनीर अनेक महिने टीकून राहू शकते. त्यामुळे येणाऱ्या थंडीच्या कालावधीमध्येही या पनीरचा वापर करता येणार आहे.

 

भारत-चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर संघर्ष अजून मिटलेला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ थंडीच्या दिवसात भारतीय लष्कराच्या जवानांना अतिथंड अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे. हा संघर्ष हिवाळ्यामध्येही सुरु राहण्याची शक्यता लक्षात येथे सैनिकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा निवाऱ्याची व्यवस्था एलएसीजवळ उभारण्यात आली आहे. अतिउंचीवरील प्रदेशास अनुकूल असा हा आधुनिक निवारा आहे. थंडीच्या काळात चीनने कदाचित पुन्हा आगळिक केलीच तर या आधुनिक निवाऱ्यांचा सैनिकांना मोठा फायदा होणार आहे.

.

गावकरी जवानांना साग सारख्या पालेभाज्याही पाठवत आहेत. या भाज्या पाण्यामध्ये उकळून खाता येतात. स्थानिकांमध्ये लोकप्रिय असणारी सत्तूची पावडरही सैनिकांना पाठवली जात असून ही पावडर पाण्यात उकळून त्याचा सूपसारखा वापर करता येतो. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता मिळण्यास नक्कीच फायदा होईल. हे अन्न पदार्थ प्रामुख्याने उंच ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांना पाठवण्यात येत आहेत. थंडीच्या कालावधीमध्ये हे पदार्थ सैनिकांना रेडी टू इट प्रमाणे केवळ गरम पाण्यात उकळून खाता येतील असा या मागील उद्देश आहे. सप्टेंबरमध्येही स्थानिक गावकऱ्यांनी सैनिकांना खाण्याचे पदार्थ दिले होते .

अक्साई चीनमध्ये दिर्घकाळासाठी सैनिक तैनात ठेवण्याची तयारी चीनने केली आहे. एकीकडे भारताबरोबरच बैठका घेत दबाव बनवण्याचा चीनचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे लष्करी सुसज्जतेलाही चीनने प्राधान्य दिलं आहे.

Protected Content