मल्लिकार्जुन खरगे यांचे काँग्रेस नेतृत्वाला समर्थन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेतृत्वाचं समर्थन करत अंतर्गत कलहाचा पक्षावर परिणाम होत असल्याचा आरोप केला आहे. जर काही लोकं पक्षाला आतूनच कमकुवत करत राहिले तर आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही, असंही खरगे म्हणाले.

काही दिवसांपासून काँग्रेसमधीलच काही नेते काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी सातत्यानं खराब होत आणि आणि नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांमध्येही त्यांची कामगिरी चांगली नव्हती. काँग्रेसच्या या कामगिरीवर विरोधकांकडून सातत्यानं टीका होत आहे.

“निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी या अंतरिम अध्यक्षा म्हणून कार्यरत राहतील असा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीनं केला होता. निवडणुका अद्याप बाकी आहेत. आम्ही एका ठिकाणी १०० पेक्षा अधिक लोकांना एकत्र आणू शकत नाही. तरीही लोकं यावर चर्चा करत आहेत,” असं खरगे म्हणाले. ”पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल आणि पक्षातील काही नेत्यांबद्दल बोलणं हे त्रासदायक आहे,” असंही ते म्हणाले.

“एकीकडे भारतीय जनता पक्षा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमच्या मागे पडला आहे. दुसरीकडे पक्षातील अंतर्गत कलहानं पक्षाला हादरवलं आहे. जर काही लोकं पक्षाला आतूनच कमकुवत करत राहिले तर आम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. जर आमची विचारधारा कमकुवत झाली तर पक्षाची वाताहत होईल,” असंही खरगे यांनी स्पष्ट केलं.

पक्ष नेतृत्वावर टीका करणाऱ्या नेत्यांवरही खरगे यांनी निशाणा साधला. “काही नेत्यांचा निवडणुकांध्ये पराभव झाल्यानंतरही त्याचा दोष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना देतात. तुम्ही तुमच्या राज्यातील नेते आहात, निवडणूक क्षेत्रातील नेते आहात. जेव्हा पक्षाकडून तिकिट दिलं जातं तेव्हा आपल्या लोकांच्यासाठी तुम्ही तिकिट मागता. जर आम्ही तुमच्या लोकांना तिकिट दिलं नाही तर ही आमची जबाबदारी नाही असंही तुम्ही त्यावेळी म्हणता,” असंही त्यांनी नमूद केलं. “१०० पैकी १० किंवा ५ टक्क्यांचा फरक असू शकतो. परंतु आम्ही ९० टक्के तेच करतो ज्याची तुम्ही मागणी करता. परंतु नंतर पक्षात एकी नसल्याचं म्हणत दोष देत राहतात. तिकिट योग्यप्रकारे देण्यात आलं नाही, ते विरोधी पक्षातून होते अशाप्रकारे दोष दिला जातो,” असंही खरगे यांनी नमूद केलं.

Protected Content