शिवसेनेची भूमिका स्पष्ट, कुणी आम्हाला शिकवू नये – ठाकरे

udhdhav thakarey

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिकवू नये. शिवसेनेने सतत आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. असे सांगतानाच नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केले याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, असेही त्यांनी याबाबत म्हटले आहे.

 

सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करणे ही देशभक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात मतदान करणे हा देशद्रोह आहे, ही मानसिकता बदलायला हवी. या सर्वांपेक्षा देशात राहणाऱ्या जनतेसमोरचे रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक जे लोकसभेत मांडण्यात आले त्यावर अद्याप स्पष्टता नाही. भारताच्या शेजारी असलेल्या देशांच्या नेत्यांना एक हादरा देणे आवश्यक होते. त्या देशांमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायानंतर त्यांना इशारा देणे आवश्यक होते. परंतु आता तसे होताना दिसत नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आमच्यासारखे सर्चच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमताने मंजुर झाले, यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दिला होता. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे असल्याने शिवसेनेने त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

“राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे,” असेही ते म्हणाले होते.

Protected Content