रेल्वे पुलाजवळ अनोळखी तरूण जखमी अवस्थेत आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ममुराबादरोडवरील रेल्वेच्या पुलावरुन ३० वर्षीय अनोळखी तरुण खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी १३ डिसेंबर रेाजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हा तरुण रात्रभर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे किरण पाठक यांनी त्याला लागलीच रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अधिक माहिती अशी की, शहरातील ममुराबाद रोडवर रेल्वेपुल असून या पुलावरुन अंदाजे ३० वर्षीय तरुण खाली पडला. मंगळवारी १३ डिसेंबर रेाजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा तरुण जखमी अवस्थेत विव्हळत असल्याचे परिसरातील नागरिक सत्यवान वाघ याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. पोलीस कर्मचारी किरण पाठक यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत जखमीला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. रेल्वेपुल हा उघडा असल्याने हा तरुण रेल्वेतून प्रवास करीत असतांना पडल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणाच्या शरिरावर दिनेश सुनिता नाव गोंदलेले आहे. तरी या जखमीची ओळख पटविण्याचे आवाहन किरण पाठक यांनी केले आहे.

Protected Content