रेल्वेकडे ४००० डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून रेल्वेने डब्ब्यांचे कोविड केअर कोचमध्ये रूपांतर केले आहे. रेल्वेकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे  सज्ज आहेत. राज्य सरकारने या कोविड केअर कोचची मागणी केली, तर ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

देशभरात संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत बाधित आढळून येत आहेत, आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे, रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत आहे. अशावेळी लढाईत योगदान देण्यासाठी रेल्वे विभाग देखील पुढाकर घेताना दिसत आहे.

 

 

 

कोविड केअर कोचमध्ये रेल्वेकडून रूग्णांच्या सुविधेसाठी अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कुलर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा यामध्ये समावेश आहे.

 

 

वाढत्या रूग्ण संख्येमुळे ज्या राज्यांकडे आयसोलेशन बेड्स उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी रेल्वे विभागाने आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्याची तयारी या अगोदरच दर्शवली होती.

 

पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच उपलब्ध असून, त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओकडून देण्यात आली होती.

Protected Content