मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना आजारावर प्रभावी पडणाऱ्या रेम्डेसिवीर इंजेक्शन दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी याबाबतची माहिती दिली
राज्यातील ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या काळात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र फेब्रुवारी, 2021 ही रुग्णसंख्या अचानक झपाट्याने वाढत होती.
राज्यात ऑक्टोबर ते जानेवारी या कोविड-19 चे रुग्ण बरेच कमी झाले होते. पण यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. फेब्रुवारीत दरदिवशी सुमारे 10 हजार कोरोना रुग्ण आढळत होते. सद्यस्थितीत राज्यात 98 हजार 859 सक्रीय रुग्ण आहेत. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
कोविड-19 आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर केला जात आहे. सध्या कोरोनाच्या आजारावर प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन हे औषध प्रभावी असल्याचे आढळून येत आहे. राज्यात जानेवारी, 2021 अखेरपर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यामुळे रेम्डेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले.
फेब्रुवारी, 2021 पासून रुग्णालये आणि रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली. पण छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नव्हती. त्यामुळे कमी किमतीचा लाभ रुग्णांना मिळत नव्हता. अनेक ग्राहकांकडून छापील किंमतीनुसार आकारणी केली जात नव्हती. त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत होता.
याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी याबाबतची पडताळी केली. त्यावेळी रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी या औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच घाऊक विक्रेत्यांना सुमारे 800 ते 1,300 रुपये करण्यात येत होती. म्हणजेच सरासरी 1,040/- रुपये या औषधाची किंमतीत याची विक्री होत होती.
रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली. त्यावेळी काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किंमतीवर 10 ते 30 टक्के अधिक रक्कम आकारत असल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात नफा मिळत होता. या सर्व गंभीर प्रकरणाची डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दखल घेतली.
यानुसार रेम्डेसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत आणि प्रत्याक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यातील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली. यासंदर्भात सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांच्या आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्यात. तसेच रुग्णालयाची देखील बैठक घेण्यात आली. या बैठकांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील रुग्णांना छापील किंमत आकारत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा प्रशासनाने शासनास सविस्तर अहवाल सादर केला. त्यावेळी शासनाने रुग्णालयांना सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त 30 टक्के जास्त किंमत आकारुन MRP निश्चित करा, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे लवकरच रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.