तत्ताड : साधी, सरळ आणि तरल प्रेमकथा !

c9339166 3156 4a2b a256 abed02762712

 

व्वदच्या दशकात हिंदी चित्रपटांत प्रेमपटांचा ट्रेंड आला होता. नवोदित नायक- नायिका आणि जोडीला सुमधुर संगीत. चित्रपटात मग एकतर अमीरी-गरिबीमुळे खानदान की इज्जत किंवा मग खानदानी दुश्मनी असा प्रमुख अडसर. आणि शेवट एकतर प्रेमीजीवांचे मिलन किंवा एकमेकांसाठी प्राणत्याग असे ठरलेले साचेबंद कथानक असायचे. परंतु नवे चेहरे आणि लोकप्रिय गाण्यांसाठी तेव्हाची तरुण पिढी चित्रपटग्रुहात गर्दी करायची. त्या दरम्यान मराठी चित्रपटात मात्र काॅमेडीची लाट होती. मराठीत आऊट अॅड आऊट प्रेमकथा मात्र अलिकडच्या काही वर्षातच पहायला मिळु लागल्या. शाळा, फँड्री, टाईमपास, सैराट, यंग्राड हि त्याची काही बोलकी उदाहरणे. मराठी चित्रपटात मात्र नकळत अल्पवयीन प्रेमकहाण्यांचा ट्रेंड सुरु झाला. मराठी प्रेमपटांच्या यादीत आता तत्ताड चा देखील समावेश करावा लागेल.

तत्ताड हे शीर्षक आणि चित्रपटाचे पोस्टर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधे उत्सुकता निर्माण करण्यासाठी पुरेसे आहेत. ‘तत्ताड’ म्हणजे बँडबाजात वाजवल्या जाणार्‍या वाद्यांचा येणारा आवाज. त्याचबरोबर ‘तत्ताड’ हा शब्द भारी, खुप छान या अर्थानेही वापरता येतो. चित्रपटाचा नायक हा बँडमधे पिपाणी वाजवणारा असल्याने ‘तत्ताड’ हे हटके आणि समर्पक असे शीर्षक. प्रेमकथा म्हटलं की चकाचक पोशाख, नायक-नायिकेची अनावश्यक उत्तेजक प्रणयद्रुश्ये, काॉलेजची धमालमस्ती, नाचगाणी, हाणामारी, फॉरेन लोकेशन्स असा साधारण मसाला अपेक्षित असतो. ‘तत्ताड’ मात्र याला अपवाद आहे. एक साधीशी कथा असुनही ती प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. मनोरंजन करत भावस्पर्शी ठरते. चित्रपटांमधुन सामान्यांची कथा आजकाल तशी अपवादानेच पहायला मिळते. या माध्यमातुन आताशा उच्चभ्रू समाजाचेच चित्रण पहावयास मिळते. अशा चित्रपटांच्या भाऊगर्दीत “तत्ताड’चं वेगळेपण चटकन लक्षात येण्यासारखं आहे.

चित्रप़टाला ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असून बोलीभाषेचा वापर करण्यात आला आहे. संताजी उर्फ संत्या हा या कथेचा नायक. इतरांच्या लग्नात बँडमधे पिपाणी वाजवणारा. पण याचं स्वत:च लग्न अद्याप जमलेलं नाही. याला जी मुलगी पसंत पडते ती याच्या आज्जीच्या तर आज्जीला जी मुलगी पसंत पडते ती याच्या पसंतीस उतरत नाही. असंच एकदा मुलगी पहायला जायचं तर बॅडमालक दुपारी सुट्टी देत नाही. मग संध्याकाळची वेळ ठरते. आणि इतक्या लवकर नायिकेची एंट्री म्हणून प्रेक्षक चकीत होतात. त्यात दोन्हीकडच्यांचा लग्नाला होकार येतो. हा प्रेक्षकांसाठी पुन्हा एक धक्का. अरे आपण तर प्रेमकथा पहायला आलो होतो आणि हे काय हि तर ‘एका लग्नाची गोष्ट’ सुरु झाली अशी प्रतिक्रिया उमटते. पुढे काय होतं हे खरंतर चित्रपटातच पहायची मजा आहे. प्रत्येकाला वास्तव आणि आपलीशी वाटेल असे वळण घेत ही कथा पुढे सरकते.

पाहणारा कुठेन कुठे तरी त्या कथेशी स्वत:ला रिलेट करतो. कुणाला मुलगी पहायला जायचा वा मुलगा पहायला आल्याचा प्रसंग आठवेल तर कुणाला आपल्या मित्रमैत्रिणींची आठवण होईल. ज्यांनी कधी प्रेम केलं त्यांना चोरून भेटणं आठवेल. चित्रपटात कुठेही द्विअर्थी संवाद नाहीत कि भडक द्रुश्ये. चित्रपट असुनही तो ‘फिल्मी’ वाटत नाही. आपल्याच समोर किंवा आजुबाजुला हे घडत आहे असं वाटत रहातं. प्रमुख कलाकारांचा अभिनय, मनोरंजनाची झालर आणि जोडीला चित्रपटाच्या एकुणच मुडनुसार प्रसंगानुरूप गाणी. त्यामुळेच हि साधी, सरळ आणि छोटीशीच कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

लेखक आणि दिग्दर्शक म्हणून राहुल गौतम ओव्हाळ यांचा हा पहिलाच चित्रपट. कोणताही फापटपसारा न घुसवता मुळ कथानकापासुन चित्रपट कुठेही भरकटत जाऊ दिलेला नाही हि बाब प्रशंसनीय. कथेची जी गरज आहे तेवढीच पात्रे आणि त्या अनुसरूनच प्रसंग चित्रपटात आहेत. साधी गोष्ट हि तितक्याच साधेपणाने मांडली आहे. त्यामुळेच ती आवडुन जाते. क्लायमॅक्स वगळल्यास चित्रपदातील कोणताही प्रसंग उगाचच ओढुनताणुन आणल्या सारखा वाटत नाही.

नायकाच्या भूमिकेत चेतन डिके प्राॅमिसिंग वाटला. नायकासाठी आवश्यक असलेलं व्यक्तीमत्व आणि अभिनयाची जाण असं दोन्ही त्याच्याकडे आहे. त्यामुळेच तो ‘वन फिल्म वंडर’ ठरणार नाही अशी अपेक्षा. नवोदित असुनही संपूर्ण चित्रपट त्यानं आपल्या खांद्यावर पेलला आहे. नायिकेच्या भूमिकेत नाशिकची मानसी पाठक आहे हि बाब समस्त नाशिककरांसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. मानसीने नाॅनग्लॅमरस भुमिका सहजपणे साकालली आहे. भूमिकेसाठी आवश्यक ती निरागसता आणि नैसर्गिक अभिनय या द्वारे तिने नायकाला उत्तम साथ दिली आहे. दोघांचा अभिनय चित्रपटाचा एकुणच प्रवास सुकर करतो. ज्योती सुभाष यांच्या अभिनयाबाबत काय बोलायचं? त्यांनी अभिनय नाही तर पराक्का हे पात्रच सजीव केले आहे. अनिल नगरकर यांनी मामा देखील उत्तम साकारला आहे. एक वगळता नायकाच्या मित्रांच्या भुमिकेत खरेखुरे बँडमधील वादक आहेत. त्यांच्याही भुमिका जमुन आल्या आहेत. राहुल बेलापुरकर, सागर पवार, अक्षता काटकर यांनीही अन्य भूमिकांमध्ये लक्ष वेधले आहे.

संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांच्या गीतांना रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे, सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केले आहे. सोनु निगम, हरिहरन, आनंद शिंदे या सारख्या गायकांनी गायलेली हि गाणी श्रवणीय आहेत. त्यातही अल्लड हुल्लड मना, भिडलं भिडलं आणि होऊ दे तत्ताड’ हि गाणी विशेष प्रभावित करतात.
‘तत्ताड’ हा संपुर्ण परिवारासह पाहण्याजोगा चित्रपट आहे. तो अजिबात निराश न करता बर्‍यापैकी मनोरंजन करत हळुवारपणे मनाला स्पर्श करून जातो.

 

                                                                                                                                                                                   – श्रीराम वाघमारे

Protected Content