रायपूर : वृत्तसंस्था । छत्तीसगढमधील रायपूरमध्ये एका रुग्णालयात आगीने तांडव घातलं. आयसीयू विभागात लागलेल्या या आगीत पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे रुग्णालयावरील भार वाढत असतानाच आगीच्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं केलं आहे. महाराष्ट्रातील भंडारा आणि नागपूरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेप्रमाणेच ही घटना घडली
रायपूरमधील एका रुग्णालयात शनिवारी रात्री आग लागली. रुग्णालयातील आयसीयू विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती असून, पाच रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर रुग्णांना होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेचा तपास लवकरच पूर्ण केला जाईल, अशी माहिती रायपूरच्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक टारकेश्वर पटेल यांनी दिली.
आग लागली तेव्हा या रुग्णालयात ५० रुग्ण उपचार घेत होते. यात काही कोविड बाधित रुग्णही होते. महाराष्ट्रातही रुग्णालयात आग लागल्याच्या तीन घटना अलिकडेच घडल्या आहेत. भंडारा, नागपूरबरोबरच मुंबईतही एका रुग्णालयात आग लागल्याने १० रुग्णांचा मृत्यू झाला होता.