मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे शिंदे गटाच्या खासदारांमध्ये महत्वाचे स्थान निर्माण करणारे खासदार राहूल शेवाळे यांच्यावर एका महिलेने शोषणाचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
खासदार राहूल शेवाळे यांच्यावर एका महिलेने आधीच बलात्काराची तक्रार केली असून याची दखल घेण्यात आलेली नाही. तर काही दिवसांपूर्वी शेवाळे यांच्या तक्रारीवरून त्या महिलेवरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याच महिलेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेवाळेंवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबत तिने दोन व्हिडीओ देखील ट्विट केले आहेत.
या पत्रात संबंधीत महिलेने लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र, शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर आपण विश्वास ठेवला, असेही या महिलेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तर तिने ट्विट केलेल्या व्हिडीओत संबंधीत महिला आणि खासदार राहूल शेवाळे हे सोबत असल्याचे दिसून येत आहे. आता या पत्रावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.