एरंडोल-पारोळा मतदारसंघात आण्णा आणि आबांमध्ये काट्याची लढत !

WhatsApp Image 2019 09 22 at 4.53.52 PM

एरंडोल-पारोळा, रतिलाल पाटील, विकास चौधरी, राहुल मराठे | एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात चुरसीची लढत पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार डॉ. सतिश  भास्करराव पाटील , शिवसेनेकडुन माजी आमदार चिमणराव रुपचंद पाटील , भाजपातर्फे माजी  जि. प. उपाध्यक्ष मच्छिंद्र रतनजी पाटील,  पारोळा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार तर पारोळा येथील माजी नगराध्यक्ष गोविंदराव एकनाथ शिरोळे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना व भाजपाची युती झाली तर चिमणराव रूपचंद पाटील हे शिवसेनेकडुन उमेदवारी करतील. युती न झाल्यास  भाजपच्या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल. मच्छिंद्र पाटील व करण पवार यांची नावे त्यासाठी  चर्चेत आहेत.

विधानसभेच्या  एरंडोल-पारोळा मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. सतीश पाटील यांनी फारच कमी फरकाने शिवसेनेचे चिमणराव पाटील यांचा पराभव केला होता. या विधानसभा निवडणूकीत पुन्हा दोघांमध्ये काट्याची लढत होण्याची चिन्हे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांची युती झाली नव्हती. याचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. यावेळेस युती झाल्यास ही जागा शिवसेनेकडे येणार आहे. चिमणराव पाटील यांना २०१४ मध्ये केवळ १९८३ मतांनी पराभव पत्करावा लागला होता, तर भाजपाचे उमेदवार मच्छिंद्र पाटील यांना २८ हजार ९०१ मते मिळाली होती. चिमणराव पाटील यांना ५३ हजार ६७३ मते मिळाली होती. तर मनसेचे नरेंद्र पाटील हे २४ हजार ९४ मते मिळवून चौथ्यास्थानावर राहिले होते.

आजच्या घडीला राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील हे आहेत. डॉ. पाटील यांच्यासमोर माजी आमदार चिमणराव पाटील हेच प्रमुख उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत मनसे व भाजपाने जोरदार टक्कर दिली होती. परंतू यावेळी मनसेचे अस्तित्व डळमळीत आहे. त्यामुळे सतिश पाटील व चिमणराव पाटील यांच्यातच काट्याची लढत होईल, असा अंदाज आहे. यावेळी युती झाल्यास चिमणराव पाटील यांच्यासमोर  भाजपचा उमेदवार नसेल. त्यामुळे त्यांना भाजपची पारंपारिक मते मिळतील. तर दुसरीकडे गोविंद शिरोडे यांनी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. ते नेमके कोणत्या पक्षाकडून लढत देतील ? हे अद्याप निश्चित झालेले नाही.  त्यांना कुठल्याही पक्षाचे तिकीट मिळाले नाही, तर ते अपक्ष निवडणूक लढण्याचीही शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रतापराव पवार इच्छुक आहेत तर मनसेकडून विशाल सोनार हे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपकडून पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार हे देखील निवडणुकीच्या रिगणात उतरण्याचा तयारीत आहेत. युती झाली तर शिवसेनेचे चिमणराव पाटील हे उमेदवार असतील. नाहीतर भाजपाकडून करण पवार हे प्रबळ दावेदार आहेत. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने २१ तारखेला विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. मात्र, मतदारसंघात अजूनही राजकीय हालचालींना वेग आलेला दिसत नाही.

Protected Content