राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन ; अनेक विषयांवर चर्चा

मुंबई (वृत्तसंस्था) कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज फोन करून संवाद साधला. दोघं नेत्यांमध्ये अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी ठाकरे यांना दिली. तर सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे हा यातला फरक आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले होते. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याने महाविकास आघाडीतील कथित तणाव दूर होण्याची चिन्हं आहेत. कोरोना संकटात भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, तर आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा दिला आहे पण आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही, असे म्हटल्याने अस्थिरतेबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.

Protected Content