रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणारे पाच पोलीस निलंबित

 

 

जालना : वृत्तसंस्था । भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील कार्यालयाची झाडाझडती घेणाऱ्या पाच पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

कोणताही वॉरंट नसताना बेकायदेशीरपणे ही झाडाझडती घेण्यात आल्याने कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन पोलीस उप-निरीक्षकांचा समावेश आहे.

 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली आहे. ११ जून रोजी  जाफराबाद येथे ही झाडाझडती घेण्यात आली होती. दानवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी ११ जूनला वॉरंट नसतानाही आणि कोणतीही परवानगी न घेता जाफराबादमधील कार्यालयाची झडती घेतली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

 

चौकशीदरम्यान पोलिसांनी बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलीस अधीक्षकांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये उपनिरीक्षक युवराज पोठरे, नितीन काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके तसंच कॉन्स्टेबल शाबान तडवी आणि सचिन तिडके यांचा समावेश आहे.

 

सोमवारी पोलीस अधीक्षकांकडून निलंबनाचा आदेश काढण्यात आला. निलंबित कर्मचाऱ्यांकडून नेमक्या कोणत्या कारणासाठी दानवेंच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली याची माहिती अद्याप मिळालेली नसून चौकशी सुरु आहे.

 

Protected Content