लवकरच सुरू होणार उमरा तीर्थयात्रा

नवी दिल्ली । जगभरातील मुस्लीमांचे श्रध्दास्थान असणार्‍या मक्का येथील उमरा तीर्थयात्रेला आता मर्यादीत प्रमाणात पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती सौदी अरेबियातर्फे देण्यात आली आहे.

सौदी अरेबियाने उमरावरील निर्बंध मर्यादित करण्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणूमुळे उमरात गेल्या सात महिन्यांपासून बंदी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात केवळ सौदी अरेबियातील लोकांनाच उमरासाठी परवानगी दिली जाईल. नंतर मात्र टप्प्याटप्प्याने इतर देशातील नागरिकांनाही याची परवानगी देण्यात येणार आहे.

४ ऑक्टोबरपासून सौदीतील नागरिकांना उमराह करण्यास परवानगी देण्यात येणार आहे, तर निवडक देशांच्या नागरिकांना १ नोव्हेंबरपासून परवानगी देण्यात येणार आहे. पण कोविड-१९च्या संसर्गाची स्थिती यासाठी लक्षात घेतली जाणार आहे. पहिल्यांदा सौदीतील सहा हजार लोकांना दररोज या भागात एंट्री दिली जाईल. तर १ नोव्हेंबरपासून ही संख्या दररोज २०,००० होईल आणि काही परदेशी लोकांनाही उमरा करण्याची परवानगी दिली जाईल.

जगभरातील मुस्लिम वर्षभर उमरासाठी मक्का येथे जातात. वर्षातून एकदा होणार्‍या हजपेक्षा उमरा पूर्णपणे वेगळा आहे. हज हा एका महिन्यापुरता तर उमरा यात्रा ही उर्वरित वर्षांसाठी असते. बहुतेक भाविक हे हजला प्राधान्य देत असले तरी उमरा यात्रा करणार्‍यांची संख्या सुध्दा लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमिवर, सौदी सरकारचा उमरा सुरू करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह मानला जात आहे. यात सध्या तरी भारतीयांना सौदीत प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे याचा लाभ आपल्या देशातील भाविकांना होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

Protected Content