लंडन : वृत्तसंस्था । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात राहणाऱ्या हिंदू समुदायाच्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. “जसं भगवान राम आणि सीता यांनी रावणाला हरवलं तसंच आपण कोरोनावरही मात करु,” असा विश्वासही त्यांनी दिला.
येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी आव्हानं आपल्यासमोर उभी राहतील. परंतु आपण एकजुटीनं कोरोनाचा सामना करु असंही ते म्हणाले. ‘आयग्लोबल दीपावली महोत्सव २०२०’ या कार्यक्रमाचं बोरिस जॉन्सन यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं उद्धाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
“आपण एकजुटीनं करोना विषाणूवर मात करू. दीपावलीचा सण कायमच आपल्याला अंधार छेदून आपण प्रकाशाकडे जाऊ शकतो, अज्ञानावर ज्ञानाचा विजय होतो अशी शिकवण देतो. तसं आपण कोरोनावरही विजय मिळवू,” असा विश्वास असल्याचं बोरिस जॉन्सन म्हणाले.
“ज्याप्रकारे भगवान श्रीराम आणि त्यांच्या पत्नी सीता हे रावणावर विजय मिळवून आपल्या धरी परतले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे उजळले होते. त्याचप्रकारे आपण आपला मार्ग शोधू शकतो आणि विजय मिळवू शकतो. यावर्षी दीपावलीचा सण ब्रिटनमध्ये लॉकडाउनदरम्यानच साजरा केला जाणार आहे,” असंही ते म्हणाले.
यावेळी जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाचीही स्तुती केली. “लांबून आनंद साजरा करणं कठीण आहे हे मी समजू शकतो आणि तेही जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत एकत्र असता, आपल्या मित्रांकडे जाता किंवा त्यांच्यासोबत दीपावली साजरी करता. सोबतच तुमच्यासोबत समोसे असतील किंवा गुलाबजाम,” असंही मिश्कील वक्तव्य त्यांनी केलं.