रामदेव बाबाविरुद्ध अ‍ॅलोपॅथी डॉक्टर वाद आता सर्वोच्च न्यायालयात

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ऍलोपॅथी उपचार आणि डॉक्टरांवर टीका करणारे रामदेवबाबा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दिलासा द्यावा अशी विनंती केलीय

 

अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या विवादास्पद विधानानंतर योगगुरू रामदेव बाबा नेहमीच चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर देखील त्यांना त्रासाला सामोरे जाव लागत आहे. या त्रासापासुन मुक्त होण्यासाठी त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. रामदेव यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मागितला आहे. रामदेव बाबा यांच्या विधानानंतर इंडियन मेडिकल असोसिएशने त्यांच्या विरोधात देशात अनेक राज्यात एफआर दाखल केले आहेत.

 

रामदेव यांनी त्यांच्याविरोधात देशातील इतर राज्यात नोंदवलेला खटला दिल्लीत वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याविरूद्ध पाटणा आणि रायपूर येथे गुन्हे दाखल आहेत. यासह रामदेव यांनी सध्या होणाऱ्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात स्थगितीची मागणी केली आहे.

 

गेल्या आठवड्यात, योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रामदेव बाबांवर जीवघेणे आजार पसरवण्याची कृती करणे, शांतता भंग करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएमए (Indian Medical Association) च्या छत्तीसगड विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोरोनावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून वापरण्यात येणाऱ्या अॅलोपथीच्या औषधांविषयी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप रामदेव बाबांवर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातली तक्रार आयएमएनं केल्यानंतर त्यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक अजय यादव यांनी ही माहिती दिली आहे.

 

आयएमएच्या हॉस्पिटल बोर्डचे संचालक आणि रायपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. राकेश गुप्ता आणि विकास अगरवाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे.  वर्षभरापासून योगगुरू रामदेवबाबा चुकीची माहिती पसरवत आहेत. त्याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल झालेली त्यांची धमकीवजा विधानं, वैद्यकीय क्षेत्र, आयसीएमआर आणि इतर फ्रंटलाईन संघटनांबाबतची मांडलेली भूमिका यावर तक्रारीमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. उपचारांविषयी गैरसमज पसरवणारे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

 

ज्या काळात डॉक्टर, पॅरामेडिक कर्मचारी, सरकार आणि प्रशासन एकत्रपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यावेली रामदेवबाबा सर्वमान्य उपचार पद्धतींवर आक्षेप घेऊन त्याविषयी गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

 

Protected Content