राधाकृष्ण नगरात घरफोडी; लग्नासाठीचे दागिने व रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेल्या दाम्पत्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील लग्नाचे दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी कानळदा रोडवरील राधाकृष्ण नगरात उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जिनेंद्र मधुकर सैतवाल (वय-४७) रा. राधाकृष्ण नगर, नेमाडे नगरपरिसर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्याच्या मुलीचे ७ मार्च २०२१ रोजी लग्न असल्यामुळे लग्नासाठी दागिने व रोकड घरात होते. दरम्यान, जामनेर येथे त्यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून परिवारासह जामनेरला निघून गेले. बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घर फोडून घरातील दोन लोखंडी कपाट फोडून कपाटातील २० हजार रूपयांची रोकड, ९३ हजार रूपये किंमतीच ३१ ग्रॅम सोने, ८ हजार ६०० रूपये किंमतीची पायातील चांदीचे जोडवे, ३७ हजार रूपये किंमतीचे मुलीच्या लग्नाच्या साड्या आणि घागरा असा एकुण १ लाख ५८ हजार रूपये किंमतीची मुद्देमाल ऐवज लांबविला. सकाळी शेजारी राहणाऱ्या वैशाली कैलास पाटील यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने जितेंद्र सैतवाल यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सैतवाल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content