तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे-चंद्रकांत पाटील

मुंबई | “महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळी बाभडी जनता करत आहे, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांवर येत आहे” असं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांचा धनंजय मुंडेंवरही जोरदार टीका केली आहे. “काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कबुली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही” असं म्हटलं आहे.

“ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना– राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेसने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला” असा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

Protected Content