राणे हे मंत्रीमंडळातील थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे दिवस भरल्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेने आता उत्तर देत उलटपक्षी राणे हेच केंद्रीय मंत्रीमंडळातील थोड्या दिवसांचे ‘मेहमान’ असल्याची टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टार्गेट केले आहे. नारायण राणे यांनी स्वतःला महान समजणं बंद केलं, तर त्यांच्या आयुष्यातील बर्‍याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बर्‍या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल, असा टोला लगावण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते.

अग्रलेखात पुढे नमूद केले आहे की, मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे महान हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे मेहमान आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी. मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले तर त्यांच्याही समर्थनासाठी डोक्याला तेल फासून ते उभे राहतील. त्यामुळे ही जबाबदारी भाजपातील शहाण्यांवरच आहे. पुन्हा तेथे बाहेरून आलेल्या दीडशहाणे व अतिशहाण्यांची फौज निर्माण झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी धोकादायक असल्याचा इशारा यात नेण्यात आला आहे.

यात म्हटले आहे की, राणे व लाड यांच्यासारखे फुटकळ लोक कधीपासून हिंदुत्ववादी झाले? भाडोत्री लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोणी शिवसेनेवर हल्ले करू पाहत असतील तर त्यांनी आपल्या गोवर्‍या आताच सोनापुरात रचून याव्यात. शिवसेनेचे हृदय वाघाचे आहे. शिवसेना अशा लढाया स्वबळावरच लढत आली आहे. त्यांना राणे, लाडसारखे भाडोत्री लोक लागत नाहीत.

Protected Content