राज कुंद्राही देश सोडून फरार झाला तर?, मुंबई पोलिसांना भिती

 

मुंबई : वृत्तसंस्था । पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राला जामीन मिळाल्यास तो देखील नीरव मोदी आणि मेहुल चोकसी प्रमाणे परदेशात पळ काढण्याची भिती आहे.

 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी  गुन्ह्यात अटकेत आहे. काही दिवसांमध्ये राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राची न्यायालयीन कोठडीतून अद्याप सुटका झालेली नाही. दररोज नवेनवे खुलासे केले जात आहेत. राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या जामिनास विरोध दर्शवला आहे.

 

पॉर्नोग्राफीत राज कुंद्राच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राज कुंद्राच्या व्हाटस्अप चॅटवरून या प्रकरणाचा परदेशातही संबध असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. राज कुंद्राकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याने कोर्टाने राज कुंद्राला जामीन दिल्यास तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

 

राज कुंद्रा आणि रयान थोरपे यांनी वकिलांमार्फत याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. अटक करण्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचे याचिकेत म्हटलं आहे. त्याचबरोबर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला रिमांड बेकायदेशीर असल्याचेही म्हटलेलं होतं.

मुंबई पोलिसांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचं म्हणत याचिकेला विरोध केलाय. पोलिस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. राज कुंद्राला जामीन मिळाल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं मत आहे. राज कुंद्रा ब्रिटनला पळून जाण्याची शक्याता मुंबई पोलिसांनी वर्तवलीय. २० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

 

Protected Content