अनिल अंबानी कर्जबाजारी ; रिलायन्स सेंटर येस बँंकेच्या ताब्यात

 

मुंबई : वृत्तसंस्था । कर्जबाजारी झालेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबईतील मुख्यालय असलेल्या रिलायन्स सेंटरची विक्री करण्याची नामुष्की ओढवली आहे. खासगी क्षेत्रातील येस बँकेने रिलायन्स इन्फ्राचे मुंबईतील सांताक्रूझ येथील मुख्यालय १२०० कोटींना खरेदी केले. 

येस बॅंकेचे अनिल अंबानी यांच्या समूहावर ४००० कोटीचे कर्ज आहे.येस बँकेचे कामकाज सध्या मध्य मुंबईतील इंडियाबुल्स येथून चालते. सांताक्रूझमधील रिलायन्स इन्फ्राचे मुख्यालय खरेदी केल्यानंतर येस बँक या संपूर्ण इमारतीत आपले कॉर्पोरेट मुख्यालय स्थलांतरित करेल.

 

अनिल अंबानी यांच्याकडे अनेक बँकांची हजारो कोटींची कर्ज थकबाकी आहे. त्यापैकी येस बँकेचे अनिल अंबानी यांच्याकडून ४००० कोटीचे येणे बाकी आहे. यातील काही रक्कम फेडण्यासाठी रिलायन्स सेंटरची विक्री केली आहे. १२०० कोटी रुपयांना हा सौदा अनिल अंबानी समूह आणि येस बँक यांच्यात झाला आहे. या व्यवहारानंतर येस बँकेची कर्ज थकबाकी निम्म्याने कमी होऊन २००० कोटी झाली आहे.

 

पश्चिम द्रुतगती मार्गावर सांताक्रूझजवळ रिलायन्स सेंटर ही इमारत आहे. तब्बल ६.९५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर या इमारतीची उभारणी झाली आहे. तर एकूण १५ हजार ५१४ चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड आहे. या इमारतीत ४२५ मोटारी आणि १५० दुचाकी पार्किंगची सुविधा आहे. मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने ही इमारत कॉर्पोरेटदृष्ट्या मोक्याच्या जागी आहे.  औद्योगिक केंद्र असलेलं वांद्रे कुर्ला संकुल १० मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे या इमारतीसाठी येस बँकेने मोठी रक्कम मोजली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

 

बँकांची कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी समूहाकडून जानेवारीपासून मालमत्ताची विक्री केली जात आहे. यापूर्वी दिल्ली आग्रा टोल रोडची विक्री करण्यात आली होती.  वीज पारेषण उद्योगातील मालमत्तांची विक्री करून निधी उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Protected Content