राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात

 

जालना: वृत्तसंस्था ।  राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू करण्यात आलं आहे.  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते   या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं.

 

जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि रेफर हॉस्पिटल म्हणून जालन्याला लागलेला डाग पुसून काढण्यासाठी या रुग्णालयाचा उपयोग होईल, अशी आशा राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे 100 खाटांचे मेडिकॅब रुग्णालय उभारण्यात आलं आहे. नेत्र विभागाचेही नुतनीकरण करण्यात आलं आहे.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. प्रताप घोडके, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, कार्यकारी अभियंता चांडक आदी उपस्थित होते.

 

मास्टरकार्ड या कंपनीच्या अर्थसहाय्याने व अमेरिका-इंडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा 100 खाटांच्या मेडिकॅब हॉस्पिटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली आहे. मास्टरकार्ड कंपनीमार्फत संपूर्ण देशामध्ये अशाच पद्धतीच्या दोन हजार खाटांच्या रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यात बारामती, अमरावती व जालना या तीन ठिकाणी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे राज्यातील पहिल्या रुग्णालयाच्या शुभारंभ जालन्यात होत असल्याचा आनंद होत असल्याचे टोपे यांनी सांगितलं.

जालना जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार व चांगल्या पद्धतीच्या मिळाव्यात म्हणून आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. जालना येथे कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात बेडची निर्मिती करण्याबरोबरच तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणात बेडस उपलब्ध करुन देण्यात आले. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यादृष्टीने लिक्विड ऑक्सिजन प्लँट, पीएसए प्लँटची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जालना जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात साधारणत: 30 हजार चौरस फूट जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पाणी, वीज व ड्रेनेज लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. मेडिकॅब हॉस्पिटलमध्ये तपासणी व निरीक्षण कक्ष, डॉक्टर कक्ष, अलगीकरण कक्ष हे चार विभाग आहेत. या ठिकाणी 92 अत्याधुनिक विलगीकरण खाटा, 8 अत्याधुनिक अतिदक्षता खाटा अशा एकूण 100 खाटा आहेत. त्याशिवाय सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, आयसीयूमध्ये एन.आय.व्ही. सुविधा, विलगीकरण कक्षामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मल्टिपॅरा मॉनिटर, ऑक्सिजन मेनिफोल्ड व ड्युरा सिलेंडर्स, जनरेटर संच, दोन पाण्याच्या टाक्या, याशिवाय आवश्यक असलेल्या इतर सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

 

Protected Content