ऑपरेशन मेघदूतचे नायक जनरल पीएन हून यांचे निधन

p.n.hun

चंदीगड वृत्तसंस्था । लेफ्टनंट जनरल आणि ऑपरेशन मेघदूतचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ हून (पी.एन.हून) यांचे आज निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी पंचकुला येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. युद्धभुमीवरील जगातील सर्वांत उंच अंतरावर असलेल्या सियाचिनवर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम भारतीय लष्कराने त्यांच्याच नेतृत्वाखाली केला होता. १९८७ मध्ये लेफ्टनंट जनरल हून पश्चिम कमांडचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

प्रकृती ढासळल्याने हून यांना पंचकुलातील चांदीमंदीर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यातच सायंकाळी ५.३० वाजता त्यांचे निधन झाले.

ऑपरेशन मेघदूत जनरल हून यांची कारकीर्दीतील सर्वांत मोठी कामगिरी होती. त्यांनी अनेक मोहिमा आणि युद्धातही महत्त्वाची भूमिका निभावली होती. १९८४ मध्ये पाकिस्तान युद्धातही त्यांनी साहस दाखवले होते. ऑपरेशन मेघदूतच्या यशस्वी नेतृत्वामुळे ते देशाचे नायक बनले होते. निवृत्तीनंतर २०१३ मध्ये जनरल हून यांनी भाजपत प्रवेश केला होता. पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये जनरल हून यांचा जन्म झाला. पण फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय भारतात आले होते.

Protected Content