राजकीय आकसातून गुन्ह्याची नोंद : गिरीश महाजन

जळगाव प्रतिनिधी । राजकीय आकसातून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा बोलविता धनी कोण ? हे सर्वांना माहिती असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी अखेर कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका वाहिनीशी बोलतांना आ. गिरीश महाजन यांनी आरोपांचा साफ इन्कार केला आहे. याप्रसंगी आ. महाजन म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो.

आ. महाजन पुढे म्हणाले की, या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत: उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेल. या मागे बोलवता धनी कोण आहे, हे सर्वांनाच माहीत असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

Protected Content