आ. चंद्रकांत पाटलांनी आमच्या नेत्यांचा आदर्श घ्यावा : उपनगराध्यक्षा

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । नाथाभाऊ व रक्षाताई खडसे यांनी कधीही विकासकामांमध्ये भेदभाव केला नाही. हाच आदर्श आमदार चंद्रकांत पाटलांनी घ्यावा असा खोचक सल्ला उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी दिला. शिवसेनेने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

याबाबत वृत्त असे की, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या कामांना मुक्ताईनगर नगरपंचायतीत मंजुरी मिळाली आहे. यात सत्ताधारी सहा नगरसेवकांनी प्रस्तावाला अनुकुलता दर्शविल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन त्या सहा नगरसेवकांचे कौतुक केले आहे. याला उत्तर म्हणून सत्ताधारी गटातर्फे उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी उपनगराध्यक्षा मनीषा पाटील म्हणाल्यात की, शहरात नव्याने जी कामे मंजूर झाली आहेत ती कामे ठराविक प्रभागांमध्ये मंजूर करण्यात आली. त्यामुळे आमदार हे केवळ काही प्रभागांचे नसून संपूर्ण शहराचे आहेत. त्यांच्या नगरसेवकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी.

मनीषा पाटील पुढे म्हणाल्या की, मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले तेव्हा नाथाभाऊ आणि खासदार रक्षा खडसे यांनी १५ ते २० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करताना सर्वच्या सर्व प्रभागांत समान न्यायाने विकास कामे करण्यात आली. त्यात प्रभाग १२, १४, १७ या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांचाही समावेश होता. मात्र आता आमदारांनी नव्याने जी कामे मंजूर करून आणली ती शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मंजूर आहेत. यात काही गौडबंगाल आहे का? हे त्यांच्या नगरसेवकांनी आधी जाहीर करावे. आमदार हे काही ठराविक प्रभागांचे नसून त्यांनी संपूर्ण शहराचा विकास करावा, अशी मागणी मनीषा पाटील यांनी केली.

आमच्या नेत्यांनी विकास करतांना कोणताही भेदभाव बाळगला नाही. आमदारांनी आमच्या नेत्यांचा आदर्श घ्यावा, असा खोचक सल्ला मनीषा पाटील यांनी याप्रसंगी दिली. या पत्रकार परिषदेला नगरसेविका साधना ससाणे, बिल्किसबी बागवान, कुंदा पाटील, शमिनबी खान; नगरसेवक मस्तान कुरेशी, शेख शकील खाटीक, व नीलेश शिरसाठ आदी उपस्थित होते. तर नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह अन्य पाच नगरसेवक याप्रसंगी उपस्थित नव्हते.

Protected Content