राजकारणात गणितच नव्हे तर केमिस्ट्रीही चालते ! : फडणवीस

नागपूर प्रतिनिधी | विधानपरिषद निवडणुकीतील दोन्ही जागा पटकावल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढत राजकारणात गणितच नव्हे तर केमिस्ट्रीही चालत असल्याचे सुनावले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, तीन पक्ष एकत्र आल्यावर विजय होतोच असं नाही. या निकालाने ते सिद्ध केलं आहे. राजकारणात केवळ गणितं चालत नाहीत. तर राजकीय केमिस्ट्री चालते. बावनकुळे यांचा विजय झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. बावनकुळे यांना मोठा विजय मिळाला. मी स्वत: निवडून आलो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता. त्यापेक्षा आजचा आनंद मोठा आहे. या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीस यांनी अकोल्यातील निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले की, अकोल्यात वसंतराव खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. एकूण विधान परिषद निवडणुकीत चार जागी भाजप विजयी झाला आहे. जनता भजापच्याच पाठी आहे. भविष्यातही जनतेचा भाजपला आशीर्वाद मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.तसेच ही विजयाची सुरुवात आहे, असा दावाही त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महापालिकेची तयारी केली आहे. भाजप महापालिका निवडणुका चांगल्या फरकाने विजयी होईल. भाजपच महापालिकेत नंबर एकचा पक्ष होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Protected Content