नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी रात्री ट्विटरवरुन अनेक भाजपा नेते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप हैराण झाला आहे
“मला आज अनेक भाजपा नेत्यांचे फोन आले. त्यांनी आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत असं मला सांगितलं आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. अजूनही आम्ही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असं हे नेते म्हणाले,” असं ट्विट टिकैत यांनी केलं आहे.
सिंघू सीमेवर सुमारे दोनशे जणांच्या जमावाने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ातही शेतकऱ्यांवर दगडफेक आणि मारहाण केली. त्यांच्या तंबूंची मोडतोड केली. त्यामुळे आंदोलनस्थळी शुक्रवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. या घटनेत काही शेतकरी जखमी झाले. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यानंतर शेतकरी आंदोलनातील दोन प्रमुख संघटनांनी माघात घेत आंदोलनातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं. तसेच उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीच्या सिमांवरील शेतकरी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सिंघू सीमेवरही पोलिसांनी कारवाई केल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान याच गोंधळादरम्यान भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा केला आहे. टिकैत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
टिकैत यांनी शनिवारी सकाळीही एक ट्विट केलं असून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमा होण्यासाठी निघाले असल्याचं म्हटलं आहे. “आज सकाळपासूनच गावांमधून ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झालीय. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार आहेत,” असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
मी आंदोलन गुंडाळून निघून जाऊ शकलो असतो किंवा स्वत:ला अटकही करून घेतली असती पण, तसे केले असते तर, शेतकऱ्यांवर देशद्रोहाचा डाग लागला असता, तो कधीही पुसला गेला नसता आणि हेच मला मान्य नाही. आंदोलनाविरोधात षडयंत्र रचले असून आता मी जीव गेला तरी हटणार नाही, असे टिकैत यांनी म्हटलं आहे.
गाझीपूर प्रशासनाने आंदोलनस्थळावरील वीज व पाण्याचा पुरवठा तोडला असला तरी दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’ सरकारने दोन्ही पुरवण्याची तयारी दाखवली. गावाकडून पाणी आल्याशिवाय पाणी घेणार नाही असे टिकैत म्हणाले होते. त्यांच्यासाठी पाणी आणले गेले व लहान मुलाच्या हस्ते टिकैत यांना दिले गेले. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मुझफ्फरनगर येथे ‘महापंचायत’ घेऊन आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. छोटय़ा-छोटय़ा गटांमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीकडे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
प्रजासत्ताक दिनी लालकिल्ला, आयटीओ व अन्यत्र झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शेतकरी आंदोलनावरील दबाव वाढू लागला आहे. दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांना आंदोलनस्थळावरून उठवण्याचे प्रयत्न गुरुवारी उत्तर प्रदेश प्रशासनाने केले. आंदोलन संपवण्यासंदर्भात गाझीपूर पोलिसांनी टिकैत यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना दगाफटका होण्याची भीती व्यक्त करत टिकैत यांनी ‘गोळी मारली तरी हटणार नाही’ असे भावनिक आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पश्चिम उत्तर प्रदेश आणि दक्षिण हरियाणातील जाट समाजाने टिकैत यांना पाठिंबा दिला. खाप पंचायतींनीही टिकैत यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने शेतकरी शुक्रवारी सकाळी गाझीपूरच्या सीमेवर आंदोलनस्थळी येऊन दाखल झाले. प्रजासत्ताक दिनानंतर गावी गेलेले शेतकरी पुन्हा गाझीपूरला परतल्यामुळे गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा ओघ वाढला.