जळगाव प्रतिनिधी । शेतकरी बांधवांनी युरीया खताचा जास्त वापर करु नये. तसेच खतांचा अनावश्यक साठा करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगांव जिल्ह्यात सर्व तालुक्यात या महिन्यात पेरणी योग्य पाऊस झालेला आहे. सद्या पेरणी सुरु असुन जुनअखेर संपुर्ण क्षेत्रावर पेरणी पुर्ण होणार आहे. जिल्ह्यात बियाण्याचा साठा पुरेश्या प्रमाणात असुन बीयाणांची कोणतीही टंचाई नाही. त्यामुळे शेतकर्यांनी काळजी करू नये. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी बांधवांना एका निवेदनाच्या माध्यमातून केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात कापुस हे प्रमुख पीक असुन कापुस पीक लागवड करतांना खतांचा पहिला डोस एकरी ५० किलो डिएपी व ४० किलो म्युरीट ऑफ पोटॅश किंवा २० किलो युरीया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४० किलो म्युरीट ऑफ पोटॅश एवढ्या अल्प प्रमाणात खताची आवश्यकता असते.
ना. पाटील यांनी पुढे नमूद केले आहे की, जास्त प्रमाणात युरीया खत दिल्यास पीकांची कायिक वाढ जास्त होऊन रसशोसक किंडींचा प्रादुर्भाव वाढतो व त्यामुळे किटकनाशक नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढतो. तरी शेतकरी बांधवांनी युरीया खताचा जास्त वापर करु नये. तसेच खतांचा अनावश्यक साठा करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात कृषि सेवा केंद्रांवर कोणतेही खत जास्त दराने विक्री करत असल्यास त्वरीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे तक्रार करावी. शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होणार नाही याकरीता सर्व नियमांचे पालन करावे तसेच शेतीची कामे करतांना सुरक्षीत अंतर ठेवावे व कामे झाल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. लहान मुले व वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.